दत्तक घेतलेली मुलगी बेपत्ता झाली; नैराश्याने कलाकाराने पत्नीसह केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील उडुपीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका पती पत्नीने साडीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे. त्यांनी दत्तक घेतलेली 16 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यामुळे या दाम्पत्यांनी नैराश्यात हे टोकाचे पाऊल उचलले आहे. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली असून त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.

उडुपी जिल्ह्यातील कौप तालुक्यातील ही घटना आहे. येथे मंगळवारी एका दाम्पत्याने राहत्या घराच्या एका खोलीत गळफास घेतला. लीलाधर शेट्टी (68) आणि वसुंधरा शेट्टी (59) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांनी 16 वर्षांपूर्वी एक मुलगी दत्तक घेतली होती. ती अचानक घरातून बेपत्ता झाली आहे. या तणावाने त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे दोघांनीही मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारात घरातच साडीने गळफास घेत जीवन संपवले. परंतु त्यांची मुलगी अद्याप सापडलेली नाही. शेट्टी कुटुंबीयांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून बेपत्ता मुलीचा शोध पोलीस घेत आहेत.

या जोडप्याने अनेक पुरस्कार मिळवले
लीलाधर शेट्टी हे एक कलाकार होते. त्यांनी रंगतरंगा थिएटर ग्रुपची स्थापना केली होती. तसेच त्यांना सामाजिक कार्याचीही आवड होती. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. तसेच लीलाधर यांनी एकेकाळी कौप विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि ते मेजर ग्रामपंचायतीचे सदस्य होते.