

<<आसावरी जोशी
38 कृष्ण व्हिला. गेल्या वर्षी आलेले नाटक.. आज मराठी नाटकांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.. आणि त्यामुळे मराठी रंगभूमीही कसदार नाटकांनी पुन्हा नव्याने बहरते आहे.
38 कृष्ण व्हिला. खूप नवे असे नाही म्हणता येणार.. मी जो पाहिला तो पार्ल्यात 107 वा प्रयोग होता. पण अजूनही नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.. अर्थात हा प्रतिसाद आहे डॉ. गिरीश ओकांच्या अत्यंत कसदार आणि राजस अभिनयाला.. पुन्हा एकदा मला येथे म्हणावेसे वाटते.. मालिकांमधून दिवसेंदिवस तरुण होत जाणारे डॉ. ओक रंगमंच मात्र एकदम तब्येतीत.. स्वत:च्या मनाप्रमाणे अक्षरश: मस्तीत जगताहेत.. काळी राणीप्रमाणे कृष्णव्हिलामध्येही डॉ. ओकांनी स्वत:च्या वयाप्रमाणे काम केले आहे.. आणि खरे सांगायचे तर डॉक्टर त्यांच्या वयाच्या भूमिकेत अत्यंत शोभतात.. येथे मला त्यांची तुलना थेट बिग बींबरोबर करावीशी वाटते. मध्यंतरी बिग बी अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या व्यासपीठावर सांगितले होते की आता ते चित्रपटात काम फक्त त्यांची आवड म्हणून आणि अत्यंत आवडीप्रमाणेच करतात.. त्याबाबत ते फार चोखंदळ असतात..जो आवडेल तोच चित्रपट निवडतात.. त्यांच्या अभिनयाच्या मानसिक समाधानासाठी ते चित्रपटांत काम करतात.. डॉ. गिरीश ओक यांची सारी देहबोली, त्यांचा अभिनय.. नाटकातील काम.. त्यांचा रंगभूमीवरील झकास वावर पाहून मला हेच सतत जाणवत राहते.. आणि खरे सांगायचे तर अशा कलावंतांचा मला निरपेक्ष आणि निर्व्याज हेवा वाटतो.. स्वत:च्या मनाप्रमाणे काम करायला मिळणे याचा जो एक निखळ.. सुरेख आनंद असतो तो मला डॉक्टरांच्या देहबोलीतून जाणवत राहतो..
या नाटकाचे कथानक मराठी साहित्य.. साहित्यिक.. साहित्यिकांची सारस्वती.. कथा.. कादंबऱ्या.. याभवतीच फिरते.. आणि कथानकाची ही जाणीवच साहित्यप्रेमींना फार सुखावणारी आहे.. याचे सारे श्रेय नाटकाच्या लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांना द्यावे लागेल.. नंदिनी चित्रे.. प्रथितयश लेखक देवदत्त कामत.. आणि नंदिनीचा कधीही समोर न आलेला नवरा मोहन चित्रे या तीन व्यक्तिरेखांची ही गोष्ट आहे.. देवदत्तना साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा अक्षररत्न पुरस्कार जाहीर झालेला असतो.. आणि तो त्यांनी स्वीकारू नये यासाठी नंदिनी त्यांना निनावी फोन, पत्रे यांचा भडीमार करत असते.. शेवटी नंदिनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवते. आणि तिची समजूत काढण्यासाठी म्हणून देवदत्त नंदिनीला 38 कृष्णव्हिला या त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतात.. आणि नाट्याला सुरुवात होते.. नंदिनी असंख्य आरोप – प्रत्यारोप देवदत्तांवर करते.. आपल्या खुमासदार शैलीत नंदिनीचा प्रत्येक आरोप खोटा ठरवून तिलाच आपणच या साऱ्या पुस्तकांचे लेखक आहोत हे अगदी सहज पटवून देतात.. नंदिनीची खात्री पटते.. ती जायला निघते.. आणि येथेच रहस्य उकलण्यास सुरुवात होते.. देवदत्त स्वत: कबुल करतात की भग्न वगळता त्यांच्या नावे असणाऱ्या सर्व कादंबऱ्या नंदिनीचा नवरा मोहन चित्रे याच्या आहेत.. आणि त्याच्या सांगण्यावरूनच त्यांनी या साऱ्या साहित्यकृतींचे श्रेय स्वत:कडे घेतलेले आहे.. आणि यातून सुरु होतो नात्यांचा रहस्यमयी गुंता.. प्रेक्षकही या गुंत्यात सहज गुंतत जातात.. तो त्यांच्यापरीने सोडविण्याचाही प्रयत्न करतात.. पण तो सुटत नाहीच हेही तितकेच खरे..

लेखिका, अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे यांनी हे नाटक लिहिले आहे..नाटकाचा विषय वेगळा आणि उत्तमच आहे.. त्यांनी तो मांडलाही चांगला आहे.. पण येथे एक प्रकर्षाने जाणवते की लेखिका गुंता निर्माण करण्याच्या नादात तो गुंता सोडविण्याचेच विसरून गेली आहे.. नाटक नक्कीच गूढ असावे.. पण त्या गुढतेची उकलही तितक्याच सुस्पष्टपणे व्हावी.. नेमके हेच लेखिकेच्या लेखणीतून सुटून गेले आहे.. पण अन्यथा लेखन, नाटकाची मांडणी.. आणि अभिनय यात डॉ. श्वेता डॉ. ओकांना अगदी पुरेपूर साथ देतात.. दोघेही कलावंत एकमेकांचा मान राखत, समोरच्या कलावंतांच्या मोठेपणाची जाणीव ठेवूनच नाटक पुढे नेतात..
डॉ. गिरीश ओकांचे कौतुक मी वर केलेलेच आहे.. त्यांचा कसदार अभिनय.. अत्यंत सुस्पष्ट उच्चार.. आणि सहज वावर हा या नाटकाचा आत्मा आहे.. त्यासाठी त्यांना hats off!!
दिग्दर्शक विजय केंकरे. वडील दामू केंकरेंचा नाट्य वारसा अगदी समर्थपणे पुढे नेत आहेत.. आजचे नवे नाटक आणि विजय केंकरे हे समीकरण रंगभूमीवर आज सुस्साट आहे..नाटकातील रहस्य.. कलावंताना दिग्दर्शकाने दिलेले स्वातंत्र्य.. दोनच कलावंतामधून नाटक फुलविण्याचे कसब ही सारी हातोटी विजयजींना मस्त जमते..
संदेश बेन्द्रेंचे नेपथ्य अचूक.. आणि अर्थपूर्ण.. शीतल तळपदेंची प्रकाश योजना समर्पक.. अजित परबचे संगीत साऱ्या वातावरणाला ठराविक गुढतेची किनार देणारे.. मंगल केकरेंनी दोन्ही व्यक्तिरेखांना साजेसे पोशाख दिले आहेत’’
एकंदरीतच कृष्णव्हिलाची भट्टी तर उत्तम जमली आहे..
नाटक : 38 कृष्णव्हिला
निर्मिती –मल्हार + रॉयल थिएटर निर्मित
निर्माते – मिहीर गवळी
सहनिर्माते – उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम
लेखिका- डॉ. श्वेता पेंडसे
दिग्दर्शक – विजय केकरे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश योजना – शीतल तळपदे
संगीत – अजित परब
वेशभूषा – मंगल केकरे
कलाकार – डॉ. श्वेता पेंडसे, डॉ. गिरीश ओक.






























































