
बंद दुकानाचे शटर उचकटून रोकड चोरण्यात माहिर असलेली दुकली चारकोप पोलिसांच्या हाती लागली आहे. चारकोप परिसरातील भारत गॅस एजन्सीच्या बंद दुकानाचे शटर उचकटून त्या दोघांनी गल्ल्यातील अडीच लाखांची रोकड लांबवली होती. त्यांच्या अटकेमुळे घरपह्डीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
चारकोप परिसरात आर. के. अॅण्ड सन्स या भारत गॅस एजन्सीचे दुकान आहे. संध्याकाळी अज्ञात व्यक्तींनी दुकानाचे लोखंडी शटर उचकटून ड्रॉव्हरमधील दोन लाख 49 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. हा प्रकार दुसऱया दिवशी सकाळी उजेडात येताच चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक ज्योती भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश वाघचौरे तसेच पाटील, वारे, पाटेकर, शिंदे, कांबळे, वाघमारे, मोरे, कांबळे या पथकाने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यात दिसणाऱया आरोपींचा शहरातील पोलीस ठाण्यात अभिलेख आहे का ते पाहण्यात आले. परंतु आरोपी कधी पकडलेच न गेल्याने त्यांच्याबाबत उपयुक्त माहिती मिळत नव्हती. शिवाय आरोपी गुन्हा करतेवेळी पळून जाताना वाहने बदलत असल्याने त्यांचा माग काढणेदेखील कठीण बनले होते. तरीदेखील पोलिसांनी जवळपास 150 सीसीटीव्हाची तपासणी करून आरोपी शोधून काढला.
मालाडच्या म्हाडा वसाहतीतून उचलले
आरोपी मालाडच्या म्हाडा वसाहतीत राहत असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन विकास काळे (27) आणि अश्फाक शेख (16) अशा दोघांना उचलले. या दोघांना पकडल्यानंतर त्यांनी केलेले आठ गुन्हे उघडकीस आले. आरोपी हे मूळचे पिंपरी चिंचवडचे रहिवासी असून गेल्या तीन महिन्यांपासून मालाडमध्ये भाडय़ाने खोली घेऊन राहत होते. आरोपींनी जुहू, चेंबूर, ठाणे, अंधेरी, तुर्भे, वाशी या परिसरातदेखील घरपह्डी केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे.






























































