मालवण बाजारपेठेत किराणा दुकानात चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण बाजारपेठेतील नाना पारकर यांच्या पारकर किराणा मर्चंट या दुकानात चोरीची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. दुकानाच्या छप्पराची कौले काढून अज्ञात चोरटा दुकानात शिरला. दुकानातील गल्ला फोडून चोरट्याने 7 ते 8 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. बाजारपेठेत चोरी झाल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

चोरीची घटना गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाल्याची नोंद सीसीटीव्हीत आहे. मात्र, दुकानात सीसीटीव्ही असल्याची माहिती चोरट्याला असल्याने त्याने डोक्यावर छत्री धरली होती. त्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकला नाही. या चोरीच्या घटनेबाबत दुकानाचे मालक नाना पारकर यांनी माहिती दिली आहे.

दुकानाच्या मागील बाजूने शिडीच्या साहाय्याने चोर छपरावर चढला. तेथील कौले काढून तो माळ्यावर उतरला आणि दुकानात शिरला. दुकानातील पैशाची पेटी (गल्ला) कटावणीच्या साहाय्याने तोडून आतील रोख रक्कम लंपास केली. ही सर्व घटना पहाटे 5.14 ते 5.19 दरम्यान घडल्याची नोंद सीसीटीव्हीमध्ये आहे. चोरट्याने आपला चेहरा सीसीटीव्हीमध्ये दिसू नये म्हणून छत्री डोक्यावर धरली होती. दुकानाच्या पाठीमागे आजूबाजूच्या अन्य दुकानाबाहेरील सीसीटीव्ही फूटेज तपासून चोरट्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला. मात्र, काळोख असल्याने व रस्त्यावरील दिवे बंद असल्याने चोरट्याचा चेहरा दिसू शकला नाही, अशी माहिती पारकर यांनी दिली.