धाराशिवमध्ये जि.प. मुख्याधिकारी व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानातून चंदनाच्या झाडाची चोरी; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातून चोरटय़ांनी चंदनाच्या झाडाची चोरी केली आहे. याप्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिह्यातील क्लास वन अधिकाऱ्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

शासकीय निवासस्थानातील सुरक्षा रक्षक सुधीर इंगळे (42) हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या धाराशिव येथील निवासस्थानी नेहमीप्रमाणे 26 मार्च रात्री कर्तव्यावर होते. रात्री 12 पर्यंत देखरेख करुन ते झोपी गेले. याचा गैरफायदा घेत चोरटय़ांनी आत प्रवेश करून राहुल गुप्ता (सीईओ) यांच्या बंगल्याच्या पाठीमागील चंदनाचे झाड तोडून नेले. चोरटे एवढय़ावर थांबले नाहीत. त्यांनी शेजारीच असलेले अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्याही निवासस्थानात घुसून दोन चंदनाची झाडे तोडली. जि. प. चे मुख्याधिकारी राहुल गुप्ता यांच्या निवासस्थानातून एक तर अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या निवासस्थानातून दोन चंदनाची झाडे चोरीला गेली आहेत. या प्रकरणी सुरक्षारक्षक सुधीर इंगळे यांच्या तक्रारीवरुन आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.