
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जम्मू-कश्मीरमध्ये नजरकैद करण्यात आले आहे. आपचे आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेविरोधात निदर्शने करण्यासाठी ते जम्मू-कश्मीरला आले होते. मात्र त्यांना जम्मू-कश्मीर पोलिसांनी नजरकैद केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डोडा मतदारसंघाचे आमदार मेहराज मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय सिंह जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचले होते. मात्र, त्यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये नजरकैद करण्यात आले. या घटनेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
संजय सिंग सांसद है, वरिष्ठ नेता है!
जम्मू काश्मीर मे उनको हाऊस अरेस्ट करना याने तानाशाही की सभी हद्द पार करना!
जम्मू काश्मीर मे सबकुछ ठीक नही
है!
श्यामा प्रसाद मुखर्जी को भी काश्मीर हाऊस अँरेस्ट किया था,क्या बी जे पी वाले भूल गये?
जय हिंद!@SanjayAzadSln @AmitShah… https://t.co/EN4HXUri3U— Sanjay Raut (@rautsanjay61) September 11, 2025
संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, संजय सिंह हे खासदार आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत! जम्मू काश्मीरमध्ये त्यांना नजरकैदेत ठेवणे म्हणजे हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडणे! यावरून जम्मू काश्मीरमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनाही काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते, भाजपचे लोक हे विसरले आहेत का? जय हिंद!, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
संजय सिंह यांनीही या घटनेबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी सध्या श्रीनगरमध्ये असून हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. लोकशाहीत आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि निषेध करणे घटनात्मक अधिकार आहे. आज श्रीनगरमध्ये मेहराज मलिक यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात पत्रकार परिषद आणि ठिय्या आंदोलन होणार होते. परंतु सरकारी गेस्ट हाऊसचे रुपांतर पोलिसांनी छावणीमध्ये करण्यात आले असून मला, आमदार इमरान हुसैन आणि माझ्या इतर सहकाऱ्यांना गेस्ट हाऊसमधून बाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे, अशी पोस्ट करत खासदार संजय सिंह यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवण्याची माहिती दिली.