
एका चोराने भलत्याच मार्गाने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने घरातील मालकिणीकडे विचित्र मागणी केली. चोरी करण्याच्या त्याच्या अजब पद्धतीमुळे तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
थायलंडमध्ये राहणाऱ्या या चोराचे नाव पनाया प्रोमकर्ड असे आहे. चोरी करण्याच्या त्याच्या भन्नाट पद्धतींमुळे तो थायलंडमधील नाकोन सी थम्मात येथील अधिकाऱ्यांचे त्याच्यावर बारीक लक्ष होते. काही दिवसांपूर्वीच चोरीच्या एका घटनेत त्याला अटक झाली होती. नुकतीच त्याची सुटकाही करण्यात आली होती. या घटनेनंतर त्याने पहाटे दोनच्या सुमारास काब्री येथे राहणारे शिक्षिका ससिटोर्न देचक्रुआ यांच्या घराचे छत तोडले.
या चोरीविषयी शिक्षिकेने सांगितले की, जेव्हा त्यांनी घरात जोरात आवाज ऐकला तेव्हा घरात कोणीतरी आल्याचे जाणवले. अचानक त्यांच्या घराचे छत त्यांना तोडलेले दिसले. ते पाहून शिक्षिकेला आश्चर्याचा धक्काच बसला. चोर पनाया याने त्यांच्या घरात भिंत किंवा दरवाजा तोडून नाही, तर घराचे छत तोडून प्रवेश केला होता. त्याने घरात प्रवेश केल्यानंतर शिक्षिकेना अजिबात आवाज न करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने घराच्या मालकिणीकडे रोख रकमेची आणि सेक्सची मागणी केली. यावर शिक्षिकेने आपल्याकडे रोख रक्कम नसून ती त्याला अॅपद्वारे पैसे देऊ शकते, असे सांगितले. यावर चोर पनायाने तिला सांगितले की, अशा पद्धतीने पैसे घेण्यास तो मूर्ख नाही. जर अॅपद्वारे पैसे दिले, तर पोलीस त्याचा अकाउंट नंबर ट्रेस करतील, पण शिक्षिकेने पनायाला पोलिसांत तक्रार करणार नसल्याचे आश्वासन दिले. यावर पनायाने अॅपद्वारे पैसे घेण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने शिक्षिकेला सध्या त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. त्याची समस्या दूर होताच त्याने पैसे परत करण्याचे आश्वासनही शिक्षिकेला दिले, मात्र पनाया शिक्षिका ससिटोर्न देचक्रुआ यांच्या घरातून बाहेर पडत असतानाच त्याला दुखापत झाली. त्याच्यावर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी पनायाच्या आईला मुलाने केलेल्या गैरकृत्य केल्याचा संशय आला. ही गोष्ट कळल्यानंतर ती त्याला पोलिसांकडे घेऊन गेली. तिने त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन चोरीचा गुन्हा मान्य करण्यास सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासात पनाया मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे उघडकीस आले आहे.




























































