खूप कंजूस आहेस तू! वैतागलेल्या चोराने लिहिली घरमालकाला चिठ्ठी

1437

घरात होणारी चोरी किंवा दरोडे ही भीतीदायक किंवा क्लेशदायक बाब असते. पण, घरात चोरी करायला घुसलेल्या चोराचीच फजिती झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वैतागलेल्या चोराने घरमालकालाच चिठ्ठी लिहून त्याच्या कंजूसपणाबद्दल सुनावलं आहे.

ही घटना मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात घडली. इथल्या आदर्श नगीन नगरमध्ये प्रवेश सोनी नावाच्या एका सरकारी इंजिनिअरच्या बंगल्यात 4 डिसेंबरच्या रात्री एक चोर घुसला. घरात घुसण्यासाठी त्याने बंगल्याची खिडकी तोडली. घरात घुसून त्याने सगळं घर अस्ताव्यस्त केलं. पण, त्याला ऐवज तर सोडाच पण चोरी करावी असं काहीच सापडलं नाही. इतकी मेहनत केल्यानंतर हाती काहीच न लागल्याने चोर वैतागला आणि त्याने घरमालकाच्या नावे एक चिठ्ठी लिहिली.

दुसऱ्या दिवशी सोनी यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराला ही चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत त्याने बहुत कंजूस है रे तू. खिडकी तोडनेकी मेहनतभी नहीं मिली, रात खराब हो गई, असा संदेश लिहिला होता. ही चिठ्ठी त्याने सोनी यांच्या घरातील कॉफी टेबलवर ठेवली होती. ही चिठ्ठी व्हायरल झाली आणि एकच चर्चा सुरू झाली. दुसरीकडे या चोरीबाबत पोलिसांनीही तपासणी केली. चोराने घरातली कपाटं, कुलुपं तोडून सामान तपासलं होतं. संपूर्ण बंगल्यात ठिकठिकाणी त्याने चोरी करण्यायोग्य सामान शोधलं होतं. पण, त्याला काहीच न सापडल्याने त्याने हताश होऊन ती चिठ्ठी लिहिली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या