
सातारा शहरानजीक कोडोली येथील चंदननगरमध्ये असणाऱ्या ‘पुष्पकुंज रेसिडेन्सी’मधील फ्लॅटबाहेरच्या रॅकमधील बुटात लपवून ठेवलेल्या चावीने उघडून चोरट्यांनी 10 तोळे सोन्याचे दागिने असा पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याची फिर्याद भगवान श्यामराव पाटील (रा. पुष्पकुंज रेसिडेन्सी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
भगवान पाटील हे गुरुवारी (दि. 6) बाहेर गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाच्या दाराच्या कुलपाची चावी रॅकमधील बुटात लपवून ठेवली. नंतरच्या काळात चोरट्यांनी पाटील यांच्या फ्लॅटच्या बाहेरच्या रॅकमधील बुटात लपविलेली चावी शोधली. या चावीने फ्लॅटचे कुलूप उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी फ्लॅटमधील बेडरूममध्ये जात लोखंडी कपाट उघडत आतील ड्रॉवर त्याच ठिकाणी असणाऱ्या चावीने उघडला. या ड्रॉवरमध्ये असणारी साडेसात हजारांचे रोकड, अडीच तोळे वजनाचा 70 हजारांचा राणीहार, 55 हजारांचा दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, एक लाख रुपये किमतीचे चार तोळ्यांचे मिनी गंठण असे पाच लाख रुपये किमतीचे एकूण साडेदहा तोळ्यांचे दागिने लांबविले.
सायंकाळी परतल्यानंतर पाटील यांना फ्लॅटमधील ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे लक्षात आले. याची तक्रार पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक एस. बी. मोरे करीत आहेत.





























































