तिसऱ्या दिवशी मराठी बांधवांच्या आंदोलनाची धग कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मराठा सामाजासाठी १६ टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली असली तरी या घोषणेवर आमचा विश्वास नाही. आम्हाला लेखी द्या, अशी ताठर भूमिका घेत परळीतील आंदोलनकर्त्यांनी तिसऱ्या दिवशीही आपले आंदोलन सुरुच ठेवले तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आंदोलनामध्ये मराठा बांधवांनी सहभाग नोंदवला.

परळीत बुधवारी मराठा आराक्षणासाठी निघालेला मराठा क्रांती मोर्चाचे रुपांतर ठिय्या आंदोलनात झाले आणि या ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी मराठा बांधवांनी परळीच्या दिशेने कुच केली. आंदोलनाचे पडसाद विधीमंडळातही उमटले आणि मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणाही केली. मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा फसवी असून ती आम्हाला मान्य नाही आशी ताठर भूमिका घेत तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच राहिले. आज सकाळी नायब तहसिलदार क्षितीजा वाघमारे यांनी बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना फोन करुन आंदोलनाचे प्रमुख असलेले आबासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली मात्र कोणताही मार्ग निघू शकला नाही. आता जे काही होईल ते परळीतूनच होईल, असे पाटील यावेळी म्हणाले. तत्पुर्वी शासनाच्या वतीने अनेक वेळा प्रशासनामार्फत निरोप पाठवण्यात आला. परंतु तो धुडकावून लावला.

दरम्यान, परळीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ भेटत आहे. बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रस्ता रोको, ठिय्या आंदोलने होत आहेत. बसेसवर दगडफेक केली जात आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विठ्ठलाची महापुजा करु देणार नाहीत असा इशाराही देण्यात आला. परळीत सुरु असलेले हे आंदोलन शेवटचे असेल आणि ते मागण्या मान्य झाल्याशिवाय संपणार नाही, अशी भूमिका घेतली गेली.

माजलगावमध्ये लाठीमार
माजलगामध्ये मराठा क्रांती ठोक मार्चाच्या आंदोलनकर्त्यांनी परळीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांनी आपले मुंडन करुन ठिय्या आंदोलन केले. किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर वादात झाले. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाला.

घाटनांदूरमध्ये टायर पेटवले
परळीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घाटनांदूरमध्ये आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवून रस्तारोको केला. अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन  देत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. केज तालुक्यातील कुंभेफळ येथेही रास्ता रोको करण्यात आला. तर पिंपळनेरमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.