
सामना ऑनलाईन, रांची
इंग्लंडमधील यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेआधी मायदेशात विजयाचा ध्वज उंच उंच फडकवण्याच्या आणि बलाढय़ कांगारूंविरुद्धच्या वन डे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळविण्याच्या निर्धाराने टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. रांचीतील तिसरा एकदिवसीय सामना जिंकून 5 लढतींची मालिका खिशात घालण्याचे उद्दिष्ट साकारण्याचा टीम इंडियाचा निकराचा प्रयत्न असेल. या लढतीचे वैशिष्टय़ म्हणजे रांचीचा ‘लोकल बॉय’ महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीपूर्वीचा कर्मभूमी रांचीतला अखेरचा सामना खेळणार आहे. त्यामुळे ही लढत जिंकून आपल्या माजी विश्वविजयी कर्णधाराला आगळी मानवंदना देण्याचा हिंदुस्थानी संघाचा मानस असेल.




























































