मुलीने प्रेमविवाह केला; वडिलांनी पेपर कटरने कापला मुलीचा गळा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूच्या थिरुप्पूरमध्ये एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी आपल्याच मुलीचा पेरर कटरने गळा कापला आहे. वडिलांनी केलेल्या या हल्ल्यातून मुलगी थोडक्यात बचावली असून ती जखमी झाली आहे. प्रेमविवाह केल्याने आपल्याच मुलीचा जीव घेण्याची टोकाची भूमिका वडिलांनी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पुराजा हे थरुप्पूरमध्ये चित्रकार म्हणून काम करत होते. ते 19 वर्षांची मुलगी प्रियंकासोबत राहत होते. प्रियंकाचे 25 वर्षांच्या मोहम्मद यासीनशी प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका गारमेंट फॅक्टरीमध्ये दोघांची ओळख झाली होती. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. या संबंधांबाबत पुराजा यांना समजल्यावर ते संतप्त झाले. त्यांनी प्रियंकाला यासीनशी संबंध ठेऊ नये, असे बजावले आणि प्रियंकाला बहिणीच्या घरी सोडून आले होते.

प्रियंकाने यासीनसोबत 16 जुलैला आत्याच्या घरातून पळ काढला. त्या दोघांनी पळून जात लग्न केले. लग्नानंतर प्रियंका यासीनच्या कुटुंबासोबत राहत होती. घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेल्याने शनिवारी प्रियंका एकटीच घरी होती. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत पुराजा त्यांच्या घरात घुसले आणि आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याबाबत प्रियंकाला शिवीगाळ करत त्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांनी पेपर कटर घेत प्रियंकाचा गळा कापला आणि तिथून पळ काढला. सुदैवाने या हल्ल्यातून प्रियंका बचावली आहे. मात्र, गंभीर जखमी झाली आहे.

प्रियंकाच्या विव्हळण्याचा आवाज एकून शेजारी धावत आले. त्यांनी प्रियंकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पुराजाला अटक केली आहे. आपल्याला मलीने केलेला प्रेमविवाह मान्य नसून आपल्या मुलीने केलेल्या चुकीची शिक्षा देण्यासाठी आणि तिला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पुराजा यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.