इस्रायली पध्दतीने केलेल्या आंबालागवडीतून यावर्षी मिळणार भरघोस उत्पादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतीशी फारसा संबंध नसतानाही ताम्हाणेतील श्रीकांत तटकरे या तरुणाने आपल्या जागेतील एक एकर परिसरात इस्त्रायली पध्दतीने आंबा लागवड केली आहे. अडीच वर्षानंतर यातील निम्म्या झाडांना मोहोर आला असून यातून यावर्षी नक्कीच फळधारणा होणार असल्याचा विश्‍वास त्याने व्यक्त केला.

जवळपास 25 वर्षे मुंबईत मराठी रंगभूमीशी निगडीत क्षेत्रात रमलेल्या श्रीकांत शिवराम तटकरे या तरुणाने नाशिकमध्ये हा प्रयोग पाहिला. हा प्रयोग करणारे जनार्दन वाघेरे यांच्याकडून सर्व मार्गदर्शन घेत त्यांच्याकडचीच रोपे घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हा प्रयोग राबवला आहे. 25 जून 2019 ला त्याच्या एक एकर जागेत तब्बल 800 केसर आणि 50 विविध प्रकारच्या आंब्यांची लागवड करण्यात आली. पूर्णतः ठिबक सिंचन आणि सेंद्रीय खतावर ही लागवड केली आहे. स्वतः श्रीकांत आणि त्याचे वडिल शिवराम दिवसभर शेतात असतात. यावर्षी या कलमांना फळधारणा होणार हे निश्‍चित झाले आहे. 850 पैकी जवळपास 400 कलमांना मोहोर आला असून उर्वरित झाडांनाही मोहोर येईल, असा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्त केला. या प्रयोगासाठी स्थानिक कृषी अधिकारी आणि सहाय्यक त्याला मार्गदर्शन करतात.

अशी आहे इस्त्रायली लागवडीची पध्दत
इस्त्रायली पध्दतीत घन पध्दतीने आंबा लागवड करतात. कलमांची उंचावर वाढ होउ दिली जात नाही. याच्या दोन ओळींमध्ये 10 फुटांचे तर दोन झाडात केवळ 3 फुटांचे अंतर असते. कलम जोर धरू लागले की यात फांदयांची छाटणी महत्वाची ठरते. आत्तापर्यंत गेल्या 30 महिन्यात या बागेत 8 ते 10 वेळा छाटणी झाली असून यामुळे रोपे जागेवरच बहरली आहेत. याचा फायदा झाडांची उंची केवळ 5 ते 6 फुटच राहून त्याची निगा राखणे व फळ काढण्यासाठी उंचावर जाण्याची गरज लागत नाही. यात एका झाडाला एका वेळेला कमीत कमी 60 तर जास्तीत जास्त 150 आंबा मिळतो. इथे एका रांगेत 3 फुटांचे अंतर ठेवत 45 कलमांची लागवड असून हा कोकणातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे.