
>> दुर्गेश आखाडे
पहिलं मुलं जन्माला आलं ते दृष्टीहीन होतं…दुसरं मुलं व्यवस्थित असेल हि आशा होती पण तेही दृष्टीहीन… यासर्व दुःखावर,वेदनांवर फुंकर घालत तिसऱ्या मुलाला जन्म दिला तेव्हाही नियतीच्या मनात तेच होतं… तिसरं मुलही दृष्टीहीन… सलाऊद्दीन बोट यांच्या घरात अंधकार पसरला. आपल्या वेदना कवेत घेत बोट कुटूंबीयांनी आपली जीवनाची नाव हाकली. आई-वडील त्या तीन अंध मुलांची दृष्टी बनले. ज्या वयात मुलांनी आधार द्यायचा त्या वयात ते मातापिताच त्या तीन अंध मुलांची काठी बनले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथील सलाऊद्दीन बोट यांची हि करूण कहाणी आहे. सलाऊद्दीन बोट आणि त्यांची पत्नी अश्मत यांना तीन अंध मुलगे आहेत. मोठा मुलगा जहीर 40 वर्षांचा आहे. दुसरा जुनैद 34 आणि एजाज हा 32 वर्षांचा आहे. जन्मत: अंध असलेल्या तीन मुलांना मातापित्यांनी हातावरच्या फोडासारखं जपलय. घरची परिस्थिती बेताची असताना आलेलं दुःख कुरवाळत न बसता ते दोघेही मातापिता हातपाय चालवतायत. त्या तीन मुलांचे आधार बनले आहेत. सलाऊद्दीन बोट गाडीवर ड्रायव्हर होते. पण आता त्यांची दृष्टी अंधूक झाल्याने त्यांना गाडी चालवता येत नाही. सध्या दूधविक्रीवर त्यांची रोजीरोटी अवलंबून आहे. जहीरला शासनाकडून घरघंटी मिळाली आहे तर जुनैदला झेरॉक्स मशीन मिळाली आहे. बेताची परिस्थिती असताना तीनही मुलांना मुंबईतील महालक्ष्मी येथील अंध मुलांच्या शाळेत शिकवलं.मोठं केले.
कर्नाटकहून आंबवली गावात राहायला आलेल्या नसरीन देसाई या मुलीने जहीर सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि बोट कुटुंबाला एक आधार मिळाला. नसरीन स्वता शारिरीकदृष्ट्या सदृढ असताना अंध मुलाशी लग्न करण्याचा तीने निर्णय घेत समाजात दिव्यांगाविषयी असलेल्या आपुलकीचे दर्शन घडवले.नसरीनमुळे बोट कुटुंबाला एक हातभार मिळाला. घरात असलेल्या झेरॉक्स मशीनवर झेरॉक्स काढून देण्याचे काम नसरीन करते. तिसरा मुलगा एजाज शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे. सलाऊद्दीन बोट आणि त्यांची पत्नी अश्मत दोघेही आता थकले आहेत. या वयात वयस्कर आईवडीलांसाठी मुलं ही त्यांच्या आधाराची काठी असतात पण बोट मातापिता या वयातही मुलांचे आधार बनले आहेत. घरात तीन अंध मुलं असल्याने स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून बोट कुटुंबाला मदतीची अपेक्षा आहे. मदतीचे हात पुढे आल्यास त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवसात हेलकावे खाणारी बोट पुढे मार्गक्रमणा करेल.

































































