बीड जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । बीड

नापिकी, कर्जाने अगोदरच जर्जर झालेल्या शेतकऱ्यांना आता बोंडअळीनेही जीवन नकोसे केले आहे. बीड जिल्ह्यात आज तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्जमाफीला होत असलेला उशीर, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची परवड होत असून यापुढे आत्महत्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथील सुभाष गंगाधर तौर (55) यांनी आज सकाळी गावापासून दूर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. कर्ज, नापिकीमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातलगांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत म्हाळस पिंपळगाव येथील  कैलास बबन डाके (20) या तरुण शेतकऱ्याने काल विष घेतले होते. आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.

बीड तालुक्यातील बहादरपूर येथील सत्यवान कोळेकर (27) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज, नापिकीमुळेच त्याने जीवन संपवल्याचे सांगण्यात आले. मराठवाडय़ात गेल्या सात महिन्यांत जवळपास 550 शेतकऱयांनी आत्महत्या केली आहे. त्यातही बीड जिल्हय़ात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत आहे.