पर्यटन व्यावसायिकांना बंदर विभागाचा दणका, मालवणात तिघा व्यावसायिकांकडून दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वॉटरस्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग आणि प्रवासी जल वाहतुकीला शासनाने अद्याप अनलॉक प्रक्रियेत परवानगी दिलेली नसताना मालवण किनारपट्टीवरील दांडी आणि चिवला बीच समुद्रात बेकायदेशीर वॉटरस्पोर्ट आणि स्कुबा डायव्हिंग सुरू करणाऱया पर्यटन व्यावसायिकांवर बंदर विभागाने कारवाईचा बडगा उगारला.

बेकायदेशीरपणे वॉटरस्पोर्ट आणि स्कुबा डायव्हिंग सुरू करणाऱया तिघा व्यावसायिकांवर बंदर विभागाने कारवाई करत 14 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. बेकायदेशीर सुरू असलेली जलक्रीडा, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग तातडीने बंद करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी नोटिसीद्वारे दिला आहे.

बंदर विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. बेकायदेशीरपणे वॉटरस्पोर्ट सुरू केल्याप्रकरणी दांडी येथील एका व्यावसायिकाला 10 हजार रुपयांचा तर बंदर जेटी येथील एका व्यावसायिकाने बेकायदेशीर स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग सुरू केल्याप्रकरणी 2700 रुपये आणि चिवला बीच येथील एकाने बेकायदेशीर स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग सुरू केल्याप्रकरणी 1700 रुपये असा दंड बंदर विभागाकडून वसूल करण्यात आल्याची माहिती बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांनी दिली.

या तिघांनाही बंदर विभागाने नोटीस बजावली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्व जलप्रवासी वाहतूक व जलक्रीडा प्रकार बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे सुरू असलेले जलक्रीडा व जलवाहतूक बंद करावी, अन्यथा कायदेशीररीत्या कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस दिल्याची माहिती बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी दिली आहे.