सूरत हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । सूरत

गुजरात येथील सूरतमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. घरातून बेपत्ता असलेली ही मुलगी बाभळीच्या झाडांमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत सापडली तेव्हा ही घटना समोर आली. या घटनेमुळे सूरत हादरलं असून या घटनेमुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सूरत शहरातील हजीरा औद्योगिक भागात राहणाऱ्या मजूर कुटुंबातली ही चिमुरडी गुरुवारी दुपारी 4 वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला होता. त्यावेळी पोलिसांना तेथून जवळच असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये एक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत सापडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित तिथे धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केलं.

या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं असून रक्तस्राव झाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरू केला असून अद्याप त्यांच्या हाती कोणताही सुगावा लागलेला नाही.