
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मुंबई, पुणे आणि नाशिक येथील अनेक नागरिकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करुन परदेशात मौजमजा करणाऱया मुकेश सुर्यवंशी या महाठगाला पोलिसांनी अटक केली आहे.
तो 2019 मध्ये दुबईला पळून गेला होता. तीन वर्षांनंतर पुन्हा हिंदुस्थानमध्ये परत येत असताना पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. कॅनडा पोलीस दलातील मराठमोळे अधिकारी सत्यानंद गायतोंडे यांचीही या चीटरने 20 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
मुकेश सूर्यवंशी यांने सोने खरेदी आणि विक्री करणारी बोगस कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांने अनेकांना स्वस्तात सोने देता असे सांगून त्यांच्याकडून कोटय़वधी रुपये घेतले. पैसे देऊनही सोने न मिळाल्यामुळे काहींनी त्याच्याकडे पैसे परत घेण्यासाठी तगादा लावला. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर मुकेश सूर्यवंशी हा दुबईला पळून गेला. त्याचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र त्यानंतरही तो पळून जाण्यात यशस्वी झाला. तीन वर्षांनंतर तो पुन्हा हिंदुस्थानमध्ये आला असता गोवा विमानतळावर पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. पुणे शहरातही सूर्यवंशीच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सत्यानंद गायतोंडे यांची फसवणूक केल्याप्रकरणी सूर्यवंशी याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सांताक्रुझ पोलीस ठाण्यामध्येही त्याच्या नावावर एक गुह्याची नोंद आहे. सूर्यवंशी याला अटक व्हावी यासाठी गायतोंडे यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ठाणे आणि नाशिक शहरामध्येही त्यांनी काही नागरिकांची मोठय़ा रक्कमेची फसवणूक केली असल्याचे आता उघडकीस आले आहे.
सर्व दस्तऐवज बोगस
मुकेश सूर्यवंशी याने पंपनी स्थापन करताना सादर केलेले सर्व दस्तऐवज बोगस आहेत. त्याचे आधार कार्ड आणि पॅनकार्डही बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या पासपोर्टवर असलेला पत्ताही बोगस आहे. घाटकोपरमध्ये त्याच्या पंपनीचे कार्यालय दाखविण्यात आले होते. मात्र तेही बोगस असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सर्व कागदपत्रे बोगस असल्याने त्याचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या.



























































