
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा 25 वा स्मृतिदिन सोमवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्त शिवतीर्थावर माँसाहेबांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. शिवाय खोपोली येथील रमाधाम येथेही भजन, कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम कोरोना खबरदारीचे नियम पाळून आयोजित करण्यात येणार आहेत.
शिवतीर्थावर सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत माँसाहेबांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. मुंबईत कोरोना आटोक्यात आला असला तरी संकट अजून पूर्ण टळलेले नसल्याने गतवर्षीप्रमाणे या वर्षीही शिवतीर्थावर होणारा सुगम संगीत आणि भजनाचा कार्यक्रम होणार नसल्याचे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या शिवसैनिकांनी मास्क लावूनच यावे आणि सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी सोशल डिस्टंसिंग पाळूनच माँसाहेबांना पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खोपोली येथील रमाधाम येथे माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त कोरोना नियम पाळून भजन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रमाधामचे चंदूमामा वैद्य यांनी दिली.

































































