
हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिची टोकियो ऑलिम्पिकमधील घोडदौड गुरुवारीही कायम राहिली. पी.व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डट हिला 21-15, 21-13 अशा फरकाने पराभूत करीत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता पुढील फेरीत तिच्यासमोर जपानच्या अकाने यामागुची हिचे आव्हान असणार आहे.
इतिहास रचण्याच्या दिशेने पाऊल
ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानसाठी इतिहास रचण्याच्या उंबरठय़ावर पी.व्ही. सिंधू उभी आहे. दोन ऑलिम्पिकमध्ये एकाही हिंदुस्थानी महिला खेळाडूला पदक जिंकता आलेले नाही. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या पी.व्ही. सिंधूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी आहे. असे झाल्यास हिंदुस्थानची शटलक्वीन नवा अध्याय लिहील हे निश्चित.
प्रत्येक गुणावर फोकस
सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यानंतर पी.व्ही. सिंधू म्हणाली, सलग दुसऱयांदा इथपर्यंत पोहचता आले आहे. पण यापुढील प्रवासही महत्त्वाचा आहे. प्रत्येक गुणावर फोकस ठेवत आहे. प्रत्येक गेमवर माझे लक्ष आहे.
दोन विजय दूर
पी.व्ही. सिंधूला टोकियो ऑलिम्पिकमधील पदक निश्चित करण्यासाठी दोन विजयांची गरज आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत तिला पराभवाला सामोरे जावे लागले तरीही ती कास्य पदकासाठीच्या लढतीत खेळू शकते. तसेच उपांत्यपूर्व आणि उपांत्य लढतीत विजय मिळवल्यास पी.व्ही. सिंधूला अंतिम फेरीत प्रवेश करता येईल. अशा परिस्थितीत तिचे किमान रौप्य पदक पक्के होईल.मागील ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारी पी.व्ही. सिंधू यंदा मात्र पदकाचा रंग सोनेरी करण्यासाठी जिवाचे रान करील यात शंका नाही.
































































