कुस्तीत एक पदक पक्के; दोन पदके पणाला

हिंदुस्थानी नेमबाज व तिरंदाजांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराशा केली असली तरी कुस्तीपटूंनी फ्री स्टाईल प्रकारात अपेक्षित कामगिरी केली आहे. रवीकुमार दहियाने 57 किलो गटात अंतिम फेरी गाठली असून त्याने देशाचे ऑलिम्पिकधील चौथे पदक पक्के केले आहे. तो गुरुवारी सुवर्ण पदकासाठी आखाडय़ात जिवाचे रान करताना दिसेल. दुसरीकडे दीपक पुनियाचा उपांत्य लढतीत पराभव झाला. मात्र त्याच्याकडून देशाला आता कास्य पदकाची आशा लागली आहे. महिला कुस्तीपटू अंशू मलिक हिलाही रेपचेज फेरीतून कास्य पदक जिंकण्याची संधी असेल. या दोन्ही कास्य पदकाच्या लढती गुरुवारीच होणार आहेत.

रवी आखाडय़ात तळपला

रवीकुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लाम सनयेक याला संघर्षपूर्ण लढतीत चितपट करून अंतिम फेरीत धडक दिली. रवीकुमारने सुरुवातीला 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर नुरीस्लामने भारंदाज डावावर गुणांची कमाई करीत आणि रवीच्या दुहेरी पटात घुसून लागोपाठ गुणांची कमाई करीत 9-2 अशी जबरदस्त आघाडी घेतली. पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनेही पटात घुसून महत्त्कपूर्ण गुणांची कमाई करीत अंतर 7-9 असे कमी केले. मात्र केवळ अर्ध्या मिनिटाची कुस्ती शिल्लक राहिल्याने हिंदुस्थानी कुस्तीशौकीन श्वास रोखून बसले होते. तितक्यात रवीकुमारने एकेरी पटातून नुरीस्लामवर ताबा मिळवत त्याचे दोन्ही खांदे जमिनीला टेकवत अस्मान दाखवले. अखेरच्या क्षणी रवीकुमारने थरारक विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. मात्र उपांत्यपूर्व लढतीत जखमी झालेल्या नुरीस्लामनेही दमदार कुस्तीचा नजराणा पेश करून कुस्तीशौकिनांची मने जिंकली. रवीकुमारने सकाळी सुरुवातीच्या दोन्ही लढती टेक्निकल सुपिरियारिटी अर्थात तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर जिंकून रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. कोलंबियाच्या ऑस्कर एक्डुआर्डो टिग्रेरोस याचा त्याने 13-2 गुणांनी धुव्वा उडवून आपल्या अभियानास प्रारंभ केला. दुसऱया लढतीत रवीकुमारने बल्गेरियाच्या जियोर्जी केलेंटिनोक कांगेलोकची 14-4 गुणांनी दाणादाण उडवली.

पदक जिंकणारा पाचवा कुस्तीपटू

हिंदुस्थानला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देणारा रवीकुमार दहिया हा पाचवा कुस्तीपटू ठरला. याआधी मराठमोळे खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या चार कुस्तीपटूंनी हिंदुस्थानला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून दिलेले आहे. आता यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवीकुमार दहिया याने किमान रौप्यपदक निश्चित केले असून त्याचे अंतिम लक्ष सुवर्ण पदकावरच असणार आहे.

अंतिम फेरी गाठणारा दुसरा कुस्तीपटू

ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानसाठी पदक जिंकणारा रवीकुमार दहिया हा पाचवा कुस्तीपटू ठरला असला तरी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो केवळ दुसराच कुस्तीपटू ठरलाय. याआधी सुशील कुमारने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. आज रवीकुमारला सुवर्ण पदक जिंकून नवा इतिहास घडविण्याची सुवर्णसंधी असेल.

दीपक पुनिया उपांत्य लढतीत पराभूत

हिंदुस्थानचा कुस्तीपटू दीपक पुनियाला 86 किलो गटाच्या उपांत्य लढतीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरीस टेलरने एकतर्फी लढतीत 10-0 असे पराभूत केले. टेलरच्या आक्रमक खेळापुढे दीपकचा निभाव लागला नाही. मात्र अज तो कास्य पदकाच्या लढतीत नक्की पराक्रम करेल, अशी देशवासीयांना आशा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या