टोकियो ऑलिम्पिकला दणक्यात सुरूवात, हिंदुस्थानचे ध्वजवाहक मेरी कोम व मनप्रीत सिंग

कोरोनाचे संकट… स्पॉन्सर्सची ऐन वेळी माघार… स्थानिक जनतेचा विरोध… अशा विपरीत परिस्थितीत जपानी सरकार व तेथील क्रीडा असोसिएशन यांनी टोकियो ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पाऊल उचलले. टोकियो ऑलिम्पिकच्या शुक्रवारी रंगलेल्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी केलेल्या मेहनतीचे प्रतिबिंब दिसून आले. कोरोनाचे संकट मागे सारून जगातील प्रतिष्ठsचा समजला जाणारा क्रीडा महोत्सव ‘वेगवान, सर्वोच्च, मजबूत अन् एकत्र’ या ब्रीदवाक्याखाली खेळवला जात आहे, याची प्रचीती या वेळी प्रकर्षाने दिसून आली. टोकियो ऑलिम्पिकचा बिगूल वाजला. या उद्घाटन सोहळ्यात बॉक्ंिसग चॅम्पियन मेरी कोम व हॉकीचा कर्णधार मनप्रीत सिंग हे हिंदुस्थानचे ध्वजवाहक होते. आता पुढील 16 दिवसांमध्ये 33 क्रीडा प्रकारांत 11 हजारांवर खेळाडू आपापल्या देशांसाठी पदके जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील.

टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीच्या अध्यक्षा सेईको होशिमोटो व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे थॉमस बाक यांनी खेळाडूंना संबोधित केल्यानंतर जपानचे राजे नारुहितो यांनी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. यानंतर ऑलिम्पिक ध्वज फडकवण्यात आल्यानंतर ऑलिम्पिक ज्योतही प्रज्वलित करण्यात आली. ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्याचा मान जपानची युवा टेनिसपटू नाओमी ओसाका हिला देण्यात आला.

श्रद्धांजली अन् राष्ट्रगीत

टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी कोरोनाच्या काळात जीव गमावणाऱया व्यक्ती तसेच माजी ऑलिम्पियन यांच्या आठवणी जागवल्या. 1972 सालच्या म्युनीच ऑलिम्पिकमध्ये दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले इस्रायलचे खेळाडू, 2011 भूपंप व त्सुनामीत जीव गमावलेले नागरिक यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. गायिका मिसिया हिने जपानच्या राष्ट्रगीताचे गायन केले.

सांस्कृतिक सोहळा अन् ड्रोन कॅमेरा

टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. नृत्यांगनांचे कौशल्य या वेळी तमाम क्रीडाप्रेमींना बघायला मिळाले. जवळपास दोन हजार ड्रोन कॅमेऱयांच्या सहाय्याने आकाशात सादर केलेल्या प्रतिकृती सुंदर होत्या. ही दृश्ये पाहून टीव्हीवरून उद्घाटन सोहळा पाहणाऱयांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

शिस्तबद्ध सोहळा

टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा 68 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये पार पडला. पण कोरोनामुळे येथे प्रेक्षकांना नो एण्ट्री करण्यात आली होती. एक हजारांच्या आतमध्ये प्रमुख पाहुणे बोलावण्यात आले होते. प्रत्येक देशातील खेळाडूंच्या उपस्थितीवरही कात्री लावण्यात आली होती. पण या सोहळ्यादरम्यान प्रत्येकाच्या चेहऱयावर मास्क लावलेला होता. संपूर्ण सोहळ्यादरम्यान शिस्तबद्धता दिसून येत होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या