
हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपावरून मल्लांनी तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा जंतरमंतरवर रविवारी आंदोलन सुरू केले. याचबरोबर 7 स्टार महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध कनॉट प्लेस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल केलेला नाहीये. त्यामुळे ‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.
याआधी तीन महिन्यांपूर्वी ऑलिम्पियन पदकविजेती साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह आणखी काही महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. बृजभूषण सिंह यांची ‘डब्ल्यूएफआय’च्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी यासाठी बजरंग पुनियासह अनेक पुरुष कुस्तीपटूही महिला कुस्तीपटूंना साथ देण्यासाठी जंतरमंतरवर आले आहेत. लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालय व ऑलिम्पिक महासंघ यांनी जगज्जेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. बृजभूषण सिंह यांचे अध्यक्षपदाचे अधिकार गोठवून ‘डब्ल्यूएफआय’चा कारभार पाहण्यासाठी एक देखरेख समिती नेमली होती.
न्याय मिळेपर्यंत जंतरमंतरवरच राहण्याचा कुस्तीपटूंचा निर्धार
‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहे, मात्र तरीही त्यांना कोणीतरी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आम्हीही निर्धार केला आहे. आता न्याय मिळेपर्यंत जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती बजरंग पुनिया, साक्षी मलिक व विनेश फोगाट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कुस्तीपटू म्हणाले, आम्हाला अजूनही न्याय मिळेल याबद्दल विश्वास आहे. म्हणूनच आम्ही आमची समस्या घेऊन पुन्हा जनतेसमोर आलो आहोत. आम्हाला धमक्या येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आमच्याकडे लक्ष द्यायला हवे. देशाची कुस्ती सुरक्षित व्यक्तीच्या हातात जायला हवी यासाठी आमचा हा लढा सुरू आहे.
अहवाल न येताच बृजभूषण सिंह यांचे कामकाज सुरू
बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाहीये. क्रीडा मंत्रालय व ऑलिम्पिक समितीने हा अहवाल सार्वजनिक केलेला नसताना बृजभूषण यांनी कामकाजालाही सुरुवात केली आहे. मागील आठवडय़ात झालेल्या ‘डब्ल्यूएफआय’च्या बैठकीत बृजभूषण सिंह उपस्थित होते. त्यामुळे आता कुस्तीपटूंच्या सहनशीलतेचा बांध फुटला अन् त्यांनी पुन्हा एकदा जंतरमंतरवर आपले आंदोलन सुरू केले आहे.



























































