
शहरातील नव्या उड्डाणपुलावरून नेहमी सुसाट वेगाने धावणाऱया वाहनांना रविवारी रात्री वारंवार ब्रेक लावावा लागत होता. पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौकात झालेल्या वाहतूककोंडीचा परिणाम उड्डाणपुलावरील वाहतुकीवरही झाला होता. त्यामुळे तीन किलोमीटर अंतराच्या या पुलावर शेवटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात काही रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या.
संभाजीनगरकडून पुण्याकडे व पुण्याहून संभाजीनगरकडे जाणारी बहुतांश छोटी व अवजड वाहने आता उड्डाणपुलावरून वेगात मार्गक्रमण करतात. त्यामुळे उड्डाणपुलाखालील शहरांतर्गत रस्त्यांची वाहतूक कमी होऊन शहरातील वाहतूककोंडीही जवळपास कमी झाली आहे. अशा स्थितीत रविवारी (दि. 18) सायंकाळी 5 वाजेपासून उड्डाणपुलावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरू होती. कायनेटिक चौकात वाहतूककोंडी झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे मालधक्क्यावरून अनेक अवजड वाहने एकापाठोपाठ एक अशी स्टेशन रस्त्याने पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौकात आल्याने येथे वाहनांची कोंडी झाली. शहर वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दौंडकडूनही वाहतूक सुरू होती तसेच पुण्याकडून नगरकडे येणारी वाहतूकही असल्याने या चौकात चारही बाजूने वाहनेच वाहने दिसत होती. परिणामी, उड्डाणपुलावरून पुण्याकडे जाणाऱया वाहतुकीचा वेग मंदावला होता. रविवारची सुट्टी संपवून नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्याकडे जाणाऱया वाहनांची संख्या जास्त होती. त्यात रविवारी लग्नतिथी ही असल्याने ही परतीची वाहनेही उड्डाणपुलामार्गे मार्गस्थ होत होती. तब्बल दोन ते तीन तासांनी रात्री आठच्या सुमारास वाहतूककोंडी थोडी कमी झाली.





























































