मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूककोंडी; 2 किमीपर्यंत रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या सुट्टय़ा आणि मुलांच्या सहामाही परीक्षा संपल्यामुळे मुंबई, ठाण्यातील नागरिक मोठय़ा प्रमाणात आपल्या गावी जाण्यासाठी घराबाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळपासूनच बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दिवाळी सुट्टी, विकेंड आल्याने हा परिणाम असल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहने एक्सप्रेसवेवर आली. मुंबईहून पुण्याकडे येताना एचओसी ब्रिज ते अमृतांजन पुलदरम्यान सुमारे दोन कि.मी.च्या रांगा लागल्या. बोरघाटात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.  खंडाळा महामार्ग पोलीस, बोरघाटची यंत्रणा ही वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्यापही कोंडी कायम असून, मुंबईहून पुण्याकडे येणाऱया लेनवर वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

मुंबईतही कोंडमारा

मुंबईतही आज मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी पाहायला मिळाली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या असून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. असहय़ उकाडा आणि गर्दीने मुंबईकरांचा कोंडमारा झाला.