वर्षभरात 12 हजार कोटींचे चलान फाडले, देशात वाहतुकीच्या नियमांची ऐशी की तैशी…

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना गेल्या वर्षी (2024 ) तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा दंड लागला आहे. त्यापैकी 9 हजार कोटी रुपयांचा दंड अद्याप भरण्यात आलेला नाही, असे एका अहवालातून दिसून आलंय. या आकड्यांवरून असं दिसून येतंय की देशात वाहतुकीचे नियम कसे आणि किती प्रमाणात पायदळी तुडवले जात आहेत.

ऑटो टेक कंपनी ‘कार्स24’ ने चालान रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला. त्या अहवालानुसार, 2024 मध्ये तब्बल 8 कोटी चलान फाडण्यात आले. याच अर्थ प्रत्येक दुसऱ्या वाहनाला किमान एकदा तरी दंड बसला आला. गुरुग्राममध्ये दररोज अंदाजे 4500 चलान फाडण्यात आले, तर नोएडामध्ये हेल्मेटचा नियम मोडल्याबद्दल तीन लाख रुपयांचे चलान निघाले. देशात वाहतुकीचे नियम कडक असूनही त्याचे पालन होताना दिसत नाही. 55 टक्के दंड चारचाकींना तर उर्वरित 45 टक्के दंड दुचाकींना लागला आहे.

‘कार्स24’ ने चालान रिपोर्टनुसार, 43.9 टक्के लोकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करत असल्याचा दावा केला, तर 31.2 टक्के लोक वाहतूक पोलीस आहेत का, ते बघून ड्रायव्हिंग करत असल्याचे दिसून आले. ओव्हरलोडेड ट्रक ते विनाहेल्मेट ड्रायविंग अशा सगळ्यांनाच दंड बसला आहे. हरियाणामधील एका ट्रक मालकाला 18 टन ओव्हरलोड केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा दंड लावला आहे. बेंगळुरूमधील एका दुचाकीस्वाराला 475 वेळा वेगवेगळ्या कारणांसाठी 2.91 लाख रुपये दंड लागला, असे अहवालातून उघड झाले आहे.