रेल्वे प्रवाशांचे चोरखिसे कापून किमती ऐवजांची चोरी, सराईत गुन्हे करणारी गँग जेरबंद

रेल्वे प्रवाशांच्या पॅण्टच्या खिशातील चोर खिशातील किंमती ऐवज अचूक हेरून ते चोरी करणारी एक टोळी रेल्वे गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. त्या टोळीकडून पोलिसांनी 22 लाख 24 हजार किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

सुदेश (नाव बदललेले) हे कोईम्बतुर राजकोट एक्स्प्रेसने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅण्टच्या खिशाचा चोरखिसा शिताफीने कापून त्यातील सोन्याच्या बांगड्या, चांदीचे लॉकेट व रोकड असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उपायुक्त प्रज्ञा जेडगे, एसीपी रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक खेडेकर, निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली कल्याण युनिटने तपास सुरू केला.

तांत्रिक बाबी व मानवी कौशल्याच्या आधारे माहिती घेतली असता आरोपी हे सराईत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शोध सुरू केल्यानंतर काही संशयित आरोपी कल्याण परिसरात येणार असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून दोघा आरोपींना उचलले. वकार खान (39) आणि जुगल विश्वकर्मा (41) या दोघांना पकडण्यात आले. वकार हा टोळीचा प्रमुख आहे. या टोळीने केलेल्या 16 गुह्यांची उकल करण्यात यश आली आहे.

प्रत्येक वेळी वेगळे भिडू

वकार प्रत्येक वेळी नवनवीन तरुणांना सोबत घेतो. मोठा हात मारल्यानंतर तो टोळीसह सटकतो. त्यानंतर दुसऱ्या भिडूंना घेऊन चोऱया करतो. वकार बारबालांवर पैसे उडवतो. त्याचसाठी तो धावत्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चोऱ्या करतो.