
>>राजेश देशमाने
‘बुलढाणा पर्यावरणमित्र मंडळ, बुलढाणा’ यांनी ‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ हा उपक्रम सुरू केला आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपल्या हातून वृक्षारोपण केलं जाण्याचा आनंद अनुभवण्यासाठी आणि निसर्गातली हिरवाई टिकवण्यात हातभार लावण्यासाठी बुलढाणेकर यात हिरिरीने सहभाग दर्शवत आहेत. पर्यावरण, वृक्षरोपण व वृक्षसंगोपनासाठी ‘मनात झाड लावल्याशिवाय जमिनीत झाडं उगवणार नाही’ या दोन ओळींनीच वेड लावणारा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेचा वेध घेणारा हा लेख.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलढाणा शहराचे तापमानही 43 डिग्रीच्या वर जाऊ लागलेले आहे. उन्हाच्या कडाक्याने बुलढाणेकर हैराण झालेले असतानाच थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलढाणा शहराचा हा लौकिक कायम टिकून राहिला पाहिजे यासाठी काहीतरी करावे ही भावना मनात निर्माण झाली. झाडे लावून पूर्वीचे वैभव निर्माण करावे व यात लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशातून चंद्रकात काटकर यांनी ‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली
‘बुलढाणा पर्यावरणमित्र मंडळ, बुलढाणा’ यांनी 21 मे 2016 या बौद्ध पौर्णिमापासून ‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ हा उपक्रम सुरू केला. उपक्रमाचे स्वरूप असे की, प्रत्येक दिवशी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस असतोच. ज्यांचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला झाड भेट देऊन तो सांगेल त्या ठिकाणी खड्डा खोदून त्याच्याच हातून झाड लावून घेणे. या प्रक्रियेत पर्यावरणमित्र ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जातो, झाड लावून घेतो आणि झाडाचे संरक्षण व संगोपनाची जबाबदारी त्या व्यक्तीला देतो. पर्यावरण, वृक्षरोपण व वृक्षसंगोपनासाठी ‘मनात झाड लावल्याशिवाय जमिनीत झाडं उगवणार नाही’ या दोन ओळींनीच ‘याड लावलं’ अन् ‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ संकल्पना फोफावली. या उपक्रमात देवेंद्र खोत, अरविंद होंडे, जयंत दलाल, तुषार बेराड, मोहन पऱहाड, रविराणा बनसोड या पर्यावरणमित्रांचा सहभाग महत्त्वाचा असतो.
या उपक्रमामुळे झाडांबाबत वेगाने जनजागृती होत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक व मित्रांच्या सहकार्याने लोकांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस व इतर आनंदाच्या क्षणी त्या व्यक्तीशी संपर्क साधून उपक्रमाची माहिती व वृक्षारोपण करण्याचे निमंत्रण दिले जाते. त्यांच्या जवळील जागेची उपलब्धता आणि झाडाच्या सुरक्षेसाठी उपलब्ध साधनांच्या आधारावर झाडे किती लावायची हे ठरवून कार्यक्रम आखला जातो. दिलेल्या वेळेत सर्व पर्यावरण मित्र तिथे जमा होतात. योग्य जागी वृक्षारोपण करून झाडाचे संगोपन व पालकत्वाची जबाबदारी त्या व्यक्तीला दिली जाते.
पर्यावरणमित्रांची आवडलेली गोष्ट अशी की, ते जिथे जिथे वृक्षारोपणासाठी जातात तिथे पाण्याशिवाय काहीही स्वीकारत नाहीत. कारण ज्याचा वाढदिवस आहे ती व्यक्ती पर्यावरणमित्रांची अतिथी असते. वृक्षारोपणाचे आमंत्रण पर्यावरणमित्रांनी दिलेले असते. आतापर्यंत या पर्यावरणमित्रांनी बुलढाणा शहर व परिसरात जवळपास नऊ हजार झाडे लावलेली असून झाडांच्या जगण्याचे प्रमाण हे 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. झाडं जगण्याचे प्रमाण चांगले असण्यामागे भावना महत्त्वाची ठरते. हे झाड वाढदिवसादिवशी लावले गेल्याने झाडासोबत भावनांचेही रोपण होते. वाढदिवसाला लावलेले झाड जगलेच पाहिजे, वाढलेच पाहिजे, ही काळजी झाड लावणारी व्यक्ती घेत असते. त्यामुळे ही झाडे 90 टक्क्यांपेक्षा जास्त जगलेली असून काही झाडे 12 ते 15 फुटांपर्यंत वाढलेली आहेत. या झाडांचादेखील वाढदिवस साजरा केला जातो. म्हणूनच ‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ सारखे उपक्रम शासनस्तरावर देखील राबवले जावेत यासाठी पर्यावरणमित्र प्रयत्न करत आहेत.
पर्यावरणमित्रांनी आतापर्यंत सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावर झाडे लावून एकतेचा संदेश दिलेला आहे. बुलढाणा शहरातील सर्व राजकीय पुढारी, सामाजिक नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी यांचेही वाढदिवस झाडे लावून साजरे करत आहोत. प्रत्येक वसुंधरा दिनी शहरात पर्यावरणविषयक जनजागृती करणारी सायकल रॅली आयोजित केली जाते.
‘पर्यावरणमित्र बुलढाणा’ यांनी याव्यतिरिक्त जाहिरात करण्यासाठी झाडांमध्ये ठोकलेले खिळे काढून झाडांना वेदनामुक्त करण्याचा उपक्रमही सुरू केलेला आहे. याबाबत बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱयांकडे पुणीही झाडांमध्ये खिळे ठोकू नयेत यासाठी कारवाई करण्याचीसुद्धा मागणी केलेली असून सार्वजनिक बांधकाम विभाग, वन व सामाजिक वनीकरण विभाग, नगर परिषद यांची बैठकही घेतली आहे.
‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ या चळवळीचे मोठे वैशिष्टय़ असे की, ही चळवळ सुरू झाल्यापासून एकही दिवस खंड न पडता दररोज, सतत, अखंडपणे झाडे लावण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे. तसेच आतापर्यंत जी नऊ हजारांच्या जवळपास झाडे लावली, त्यासाठी एक रुपयासुद्धा खर्च करण्यात आलेला नाही. केवळ अंगमेहनतीच्या जोरावर ही चळवळ सुरू असून झाडांचा पुरवठा हा वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि काही प्रमाणात पर्यावरणमित्र त्यांच्या घरी रोपांची लागवड करून करतात.
[email protected]




























































