
सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर लक्ष केंद्रित केल्यानंतर इलेक्ट्रिक कार्स, स्कूटर, ई- बाईक मोठ्या प्रमाणावर लॉन्च करण्यात आल्या. यात बहुतांश हिंदुस्थानी कंपन्यांचा समावेश आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये ई-रिक्षा आणि ई-ऑटोनंतर आता इलेक्ट्रिक ट्रकही बाजारात दाखल होण्यास सज्ज झाले आहेत. यात ट्रेसा या कंपनीने आघाडी घेतली आहे. ट्रेसा मोटर्सने बंगळुरूमध्ये त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रक मॉडेल व्ही0.1 (V0.1) चे अनावरण केले आहे. या मॉडेलची निर्मिती अॅक्सियल फ्लक्स मोटर प्लॅटफॉर्म फ्लक्स 350 वर करण्यात आली आहे.
ट्रेसा मोटर्सने सांगितले की, इलेक्ट्रिक ट्रक मॉडेल व्ही 0.1 हे जागतिक बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. जड इलेक्ट्रिक ट्रकसाठी औद्योगिक डिझाईन, सौर फ्लक्स पॉवरट्रेन व सुरक्षित बॅटरी पॅकची काळजी घेण्यात आली आहे. हिंदुस्थानात सध्या 2.8 दशलक्ष ट्रक आहेत, जे 60% कार्बन उत्सर्जन करतात. अशा परिस्थितीत शून्य उत्सर्जन असलेल्या मध्यम आणि अवजड ट्रकची नितांत गरज आहे. ट्रेसा मोटर्सचा पारंपारिक डिझेल ट्रक्ससाठी मालकीहक्काचा कमी खर्च असलेले सुरक्षित, नाविन्यपूर्ण व पर्यावरणास अनुकूल पर्याय देण्याच्या माध्यमातून या परिवर्तनाचे नेतृत्व करण्याचा मनसुबा आहे.
ट्रेसा मोटर्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन श्रवण म्हणाले, 2024 मध्ये येणारे वाहन स्क्रपेज धोरण आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे, मध्यम आणि जड इलेक्ट्रिक ट्रकवर स्विच करण्याची ही योग्य वेळ आहे. पारंपरिक डिझेल ट्रकला कमीत कमी किमतीत सुरक्षित, नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देऊन हा बदल घडवून आणण्याचा आमचा मानस आहे. ट्रेसा मोटर्स एका वेळी एक इलेक्ट्रिक ट्रक करून भारतातील 2.8 दशलक्ष ट्रक्सना इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा प्रयत्न करणार आहे.



























































