
सामना प्रतिनिधी, कळवण
सटाणा नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनी कामाला सुपलेदिगर येथून पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच काठरे चौफुलीवर गुरुवारी आदिवासी महिला तब्बल 9 तास तळ ठोकून बसल्या. दुसऱ्या दिवशीदेखील त्यांनी काठरे चौफुलीवर सकाळपासून तळ ठोकून जलवाहिनीला विरोध दर्शविला. पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. फक्त आमचा विरोध जलवाहिनीला आहे असे या आदिवासी महिलांचे म्हणणे आहे.
राज्य सरकार व शासकीय यंत्रणेवर विश्वास नसल्याने लोकप्रतिनिधीना पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी योजना रद्द करण्यात अपयश आल्याने सटाणा नगर परिषदेच्या पाणी पुरवठा जलवाहिनी योजनेच्या पाइप गाडय़ा, मशीनरीचा ताफा पुनंद प्रकल्पाकडे येणार असल्याची माहिती जयदर, काठरे येथील आदिवासी महिलांना मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी तळ ठोकून आपला जलवाहिनीला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले आहे. सीताबाई गांगुर्डे, अनिताबाई गांगुर्डे, हिरुबाई गायकवाड, लक्ष्मीबाई चव्हाण, सोनीबाई चौधरी, बेबीबाई गांगुर्डे, जनाबाई गांगुर्डे, सुताबाई गायकवाड, फुलाबाई महाले, पार्वतीबाई पवार, आक्काबाई बर्डे, लीलाबाई महाजन, नंदाबाई बर्डे, मोहनीबाई गायकवाड, सुनीता बागुल, इंद्राबाई महाले, पार्वतीबाई गावीत, मंजीबाई खांडवी, पुतळाबाई भोये, लीलाबाई वाघ, झिगूबाई पवार, विठाबाई गांगुर्डे आदी आदिवासी महिलांसह आदिवासी बांधव काठरे चौफुलीवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना या आदिवासी महिलांनी घेराव घालून जाब विचारत धारेवर धरले होते. शिवाय या योजनेच्या ठेकेदाराला या महिलांच्या रोषाला सामोरे जाऊन घटनास्थळावरून माघारी फिरावे लागले. 125 पोलिसांच्या बंदोबस्तात जलवाहिनीचे काम सुरू होण्यापूर्वीच रोखण्यात यश आल्याने सुपलेदिगरकडे पाइप घेऊन जाणाऱया गाडय़ा रस्त्यावर अडविण्यात आल्याने जलवाहिनी कामाला गुरुवारी सुरुवात होऊ शकली नाही. शुक्रवारी गाडय़ा व मशीनरी येणार असल्याची माहिती मिळताच पुनंद प्रकल्प परिसरातील आदिवासी बांधव काठरे चौफुलीवर तळ ठोकून बसले. पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. फक्त आमचा विरोध जलवाहिनीला असल्याने जलवाहिनीचे काम थांबवावे. आदिवासी बांधवांना दमबाजी करू नये व पोलीस संरक्षण द्यावे आदी विविध मागण्या आदिवासी महिलांनी केल्या आहेत.































































