
सामना ऑनलाईन । कोलकाता
डमडम पोस्ट ऑफिसमधून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘जय बंगाल’, ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम्’ लिहिलेले 10 हजार पोस्टकार्ड मंगळवारी पाठवली. त्याच रात्री मोटरसायकलकरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी डमडम परिसरात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या केली.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी डमडम पोस्ट ऑफिसमधून दिल्लीच्या 7, लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या पत्यावर 10 हजार पोस्टकार्ड पाठवून आपली ताकद दाखवून दिल्याचे दक्षिण डमडमचे अध्यक्ष डी. बॅनर्जी यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपनेदेखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेली 10 लाख कार्ड पाठवण्याची तयारी केली आहे.
बर्दवानमध्ये बाचाबाची
लोकसभा निवडणुकीपासून भाजप-तृणमूलमध्ये संघर्ष सुरू असून बर्दवानमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत मंगळवारी बाचाबाची झाली. त्यावेळी अनेक घरे आणि दुकानात जाळपोळदेखील करण्यात आली होती. निवडणुकीत मिळवलेल्या विजयानिमित्त भाजपचे कार्यकर्ते मिठाई वाटप करताना हा प्रसंग घडल्याचा आरोप भाजपने केला आहे.


























































