
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला. मात्र, ICC च्या नियमांमुळे जगज्जेत्या संघाला विश्वचषक ठेवता येणार नाही. हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने विश्चषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. आता विश्चचषक दुबईतील आयसीसी मुख्यालयात सुरक्षित ठेवला जाणार आहे, तर विजेत्या हिंदुस्थानी संघाला विश्चचषकाची प्रतिकृती देण्यात येणार आहे.
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने रविवारी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत प्रथमच एकदिवसीय सामन्यातील विश्वचषक विजेतेपद जिंकले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर, हिंदुस्थानी संघाचे ट्रॉफीसह आनंद साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, आता हा चषक हिंदुस्थानी संघाकडून परत घेतला जाणार आहे. यामागे आयसीसीचा एक खास नियम आहे.
आयसीसीने सुमारे २६ वर्षांपूर्वी एक नियम लागू केला होता. त्यानुसार विजेत्या संघाला फक्त फोटोशूट आणि विजय परेडसाठी चषक दिला जातो. त्यानंतर तो चशक परत घेत आयसीसीच्या दुबई मुख्यालयात ठेवला जातो. विजेत्या संघाला नंतर एक प्रतिकृती ट्रॉफी दिली जाते, जी अगदी मूळ चषकासारखीच असते. हा नियम ट्रॉफी चोरीला जाण्यापासून किंवा नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी करण्यात आला आहे.
महिला विश्वचषक २०२५ चषकाचे वजन सुमारे ११ किलो आहे आणि तो सुमारे ६० सेमी उंच आहे. तो सोने आणि चांदीपासून बनवण्यात आला आहे. या चषकाचे तीन चांदीचे स्तंभ स्टंप आणि बेल्सच्या आकाराचे आहेत, तर त्याचा वरचा भाग सोन्याचा ग्लोब आहे. सर्व विजेत्या संघांची नावे त्यावर कोरलेली आहेत. यंदा हिंदुस्थानचे नाव प्रथमच या ट्रॉफीमध्ये समाविष्ट केले आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १३ महिला विश्वचषक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने सात वेळा, इंग्लंडने चार वेळा आणि न्यूझीलंड आणि हिंदुस्थानने प्रत्येकी एकदा विजेतेपद जिंकले आहे.
            
		





































    
    



















