
कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातील मुख्यालयात अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. गेल्या आठवडय़ात त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी तत्काळ पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात रंगली होती. तुकाराम मुंढे यांची यापूर्वी दिव्यांग सक्षमीकरण विभागातून अचानक बदली करण्यात आली होती. त्यानंतर दीड महिना त्यांना कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आली नव्हती.
दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र अन्न व औषध प्रशासन आयुक्तपद हे तुलनेने कनिष्ठ स्वरूपाचे पद मानले जात असल्याने 20 वर्षांचा प्रशासकीय अनुभव असलेल्या मुंढे यांची या पदावर नियुक्ती म्हणजे ‘पदावनती’ असल्याची भावना व्यक्त होत होती. दिव्यांग सक्षमीकरण विभागात कार्यरत असताना मुंढे यांनी बोगस दिव्यांग संस्था तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणाऱया अधिकाऱयांविरोधात कठोर कारवाई सुरू केली होती. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. मुंढे यांच्या आतापर्यंतच्या 20 वर्षांच्या सेवाकाळात तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली आहे.



























































