इसिसचा म्होरक्या अबू हुसेन अल-कुरेशी सीरियात ठार, तुर्कीच्या गुप्तचर संघटनेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हुसेन अल-कुरेशीचा सीरियात खात्मा करण्यात आला आहे. ‘तुर्कीच्‍या नॅशनल इंटेलिजेंस एजन्सीने केलेल्या कारवाईमध्‍ये रविवारी तो मारला गेला. याबाबत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी माहिती दिली.

सीरियाच्या स्थानिक आणि सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला तुर्की-समर्थित गटांचे नियंत्रण असलेल्या उत्तर सीरियातील जंदारिस शहरात झाला. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे येथे मोठा विध्वंस झाला होता. त्याचवेळी, या भागाची सुरक्षा सांभाळत असलेल्या सीरियन नॅशनल आर्मीने या घटनेबाबत तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

गुप्तचर यंत्रणा अनेक दिवसांपासून कुरेशीच्या मागावर होती. एका रहिवाशाने सांगितले की, शनिवार ते रविवार या काळात जंदारिसच्या काठावर चकमक झाली. सुमारे तासभर ही चकमक सुरू होती आणि त्यानंतर येथील रहिवाशांनी मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकला होता. त्यानंतर या परिसरात कोणीही प्रवेश करू नये म्हणून सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली होती.

दक्षिण सीरियातील कारवाईत कुरेशीच्या आधी आयएसचा एक नेता मारला गेला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये ISIS ने अल-कुरैशीची नवीन नेता म्हणून निवड केली होती.

इस्लामिक स्टेटने 2014 मध्ये इराक आणि सीरियाचा मोठा भाग ताब्यात घेतला. त्यावेळी त्याचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी याने संपूर्ण प्रदेशात इस्लामिक खिलाफत घोषित केले होते.