
सामना ऑनलाईन, ठाणे
विशाखापट्टणम एक्सप्रेमध्ये आज एका महिलेला जुळे झाले. सलमा तबस्सुम शेख (३०) असे महिलेचे नाव असून तिने एक मुलगा आणि मुलीला जन्म दिला आहे.
सलमा शेख या बाळंतपणासाठी घाटकोपरहून माहेरी विशाखापट्टणमला जाण्याकरिता नातेवाईकांसह निघाल्या. लोकमान्य टिळक टर्मिनसहून त्यांनी एक्प्रेसही पकडली. ही एक्प्रेस कल्याण स्थानकाजवळ येऊ लागताच सलमा यांना कळा सुरू झाल्या. सोबत असलेल्या नातेवाईकांनी लागलीच ही बाब एक्प्रेसमधील रेल्वे कर्मचार्यांना कळवली. ट्रेनमधील रेल्वे कर्मचार्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावरील कर्मचारी आणि आरपीएफला तयार राहण्यास सांगितले. गाडी कल्याण स्थानकाच्या फलाटाला लागताच आधीच ऑनड्युटी उपनिरीक्षक नितीन गौर यांच्या सूचनेनुसार तयार असलेल्या आरपीएफच्या कर्मचारी नीलम गुप्ता आणि सुरेखा कदम यांनी प्रथमोपचाराच्या साहित्यासह तत्काळ कोच क्रमांक ईसीओआर १४७०३ मध्ये एण्ट्री केली. तो कोच रिकामा केला. डब्यातील इतर महिला मदतीसाठी तयार होत्याच. कुणी आपल्या बॅगेतून साडी तर कुणी चादर काढली. त्या लावून आडोसा तयार करण्यात आला आणि पाहता पाहता ईसीओआर १४७०३ हा डबा जणू नर्सिंग होमच झाला. काही क्षणांतच डब्यातून ट्यॅहॅ.. ट्यॅहॅचे आवाज ऐकू आले आणि इतका वेळ टेन्शनमध्ये असलेल्या प्रवाशांचे चेहरे उजळले. बधाई हो.. बधाई हो.. अभिनंदन.. असे उद्गार ऐकू येऊ लागले. थोड्या वेळानंतर नीलम गुप्ता आणि सुरेखा कदम डब्याबाहेर आल्या. त्यांच्या कुशीत दोन चिमुकली बाळे होती. सलमा यांना जुळे झाले होते. या बातमीने सार्यांच्याच आनंद द्विगुणीत झाला… सलमा आणि तिच्या दोन चिमुकल्यांना तातडीने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले.




























































