
औसा येथील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना लातूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधोडा ते औसा जाणार्या रोड लगत 7 ते 8 ऑक्टोबरदरम्यान अज्ञात व्यक्तींनी इस्माईल मुबारक मनियार (वय 41, रा. हरंगुळ बुद्रुक, लातूर) यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूध्द औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खुनाच्या गुन्ह्यात अशपाक शेख व जाकीर शेख (दोघे रा. लातूर) या दोघांचा सहभआग असून त्यांनीच गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि दोघांनाही लातूर येथून ताब्यात घेण्यात आले. इस्माईल मनियार यांचा खून केल्यानंतर अशपाक शेख व जाकीर शेख हे दोघे काही घडलेच नाही, असा बनाव करून दोन दिवसापासून वावरत होते. इस्माईल मनियार याला मारहाण करून खून केल्याचे त्यांनी नंतर कबूल केले. या खूनाच्या गुन्ह्यात त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड करीत आहेत.




























































