
सोनेमिश्रित राख चोरणाऱया दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सदाम कुरेशी आणि मोहम्मद नईम कुरेशी अशी त्या दोघांची नावे आहेत. चोरीच्या गुह्यात यापूर्वी पोलिसांनी बिलाल अहमद कुरेशीला अटक केली होती.
जोगेश्वरी येथे सोने व्यावसायिक राहत असून त्याचा सारीपुतनगर येथे रिफायनरिंगचा कारखाना आहे. ते विविध ज्वेलर्सकडून फायलिंग टेबल, पॉलिशिंग वस्तू, लाँपिंग वस्तू विकत घ्यायचे. त्या वस्तू वितळवून त्यातून ते सोने काढत असायचे. एप्रिल महिन्यात त्याने मशीन टूल्स, फायलिंग टेबल आणि सोनेमिश्रित राख बाहेर ठेवली होती. दुसऱया दिवशी ते सकाळी कारखान्यात आले तेव्हा त्यांना सोनेमिश्रित राखेचे ड्रम दिसले नाहीत. त्याने शेजारील कारखान्यात चौकशी केली तेव्हा ती राख बिलाल अहमद घेऊन गेल्याचे व्यावसायिकांना सांगण्यात आले. 3 लाख रुपयाची राख चोरी प्रकरणी व्यावसायिकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी बिलाल आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड याच्या पथकातील उपनिरीक्षक कृष्णा खोत आणि पथकाने तपास सुरू केला. पोलीस बिलालचा शोध घेत होते. बिलाल हा अंधेरी येथे त्याच्या मित्राला भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून बिलालला अटक केली. त्याच्या चौकशीत सदाम आणि मोहम्मदची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एमआयडीसी येथून सदाम आणि मोहम्मदला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. सदाम आणि मोहम्मदला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.


























































