
सामना प्रतिनिधी, मुंबई
तुमच्याकडे असलेल्या पैशांमध्ये काही नोटा खराब आहेत, पैसे द्या तुम्हाला दाखवतो अशी बतावणी करीत दोघा भामटय़ांनी एका ग्राहकाला साडेसहा हजार रुपयांचा चुना लावला. 20 हजार रुपयांचे बंडल घेऊन हातचलाखीने त्यातील साडेसहा हजार काढून ते पसार झाले पण जे. जे. मार्ग पोलिसांनी आंबिवली गाठून त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
दिनेश (नाव बदललेले)हे जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी 20 हजार रुपये काढले. त्याचवेळी बँकेत घुटमळणारे दोघे दिनेशवर वॉच ठेवून होते. दिनेश यांच्या हातात नोटांचे बंडल पाहताच ते दोघे त्यांच्याजवळ गेले आणि पैशांमध्ये काही नोटा खराब असल्याचे बोलू लागले. तुम्हाला खराब नोटा दाखवतो असे बोलून त्यांनी नोटांचे बंडल आपल्याकडे घेतले आणि शिताफीने हातचलाखी करून साडेसहा हजार काढून घेतले. त्यानंतर आपली लबाडी उघड व्हायच्या आत दोघांनी तेथून पळ काढला. त्या दोघांनी आपली फसवणूक केल्याचे समजताच दिनेश यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय फरीद खान, तसेच शिंदे, राऊत, ठाकूर, विंचू व पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
आंबिवलीत सापडले
बँकेतील सीसीटीव्हीत ते भामटे कैद झाले होते. त्यांची अधिक माहिती काढल्यावर ते दोघेही आंबिवलीचे राहणारे असून रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. हमजा जाफर सय्यद आणि रजा मिसा इराणी अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. हमजा आणि रजा अंबिवली येथे येणार असल्याची खबर मिळताच पथकाने सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

























































