
मुंबई विद्यापीठाच्या प्रा. बाळ आपटे विद्यार्थी आणि युवा चळवळ अभ्यास केंद्राच्या वतीने ‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्र उभारणीत विद्यार्थी आणि युवा चळवळींची भूमिका आणि योगदान’ या विषयांवर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 18 आणि 19 जानेवारी रोजी आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत देशभरातील विविध क्षेत्रांतील अभ्यासक आणि मान्यवर विद्यार्थी आणि युवा चळवळींशी निगडित विषयांवर प्रकाश टाकतील. पहिल्या दिवशीच्या उद्घाटन सत्रात आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या बीजभाषणाने या परिषदेला सुरुवात होणार आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल हे उद्घाटनपर भाषण करतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर भुषवणार असून स्वागत आणि प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी करणार आहेत.





























































