
घरकामाचा बहाणा करून आलेल्या मोलकरणीने जेष्ठ महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध देत त्यांच्या घरातून रोकड आणि दागदागिने असा तब्बल 8 लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना येरवड्यातील कल्याणीनगरमधील इंद्रप्रस्थ सोसायटीत घडली. याप्रकरणी 73 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध महिला कल्याणीनगर येथील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये एकट्या राहायला असून त्यांचे कुटुंबीय खालच्या फ्लॅटमध्ये राहतात. घरकामासाठी त्यांनी मोलकरीण शोधण्याचा प्रयत्न केला. ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्यांनी माहिती घेऊन 27 जून 2021 पासून एका महिलेला घरकाम दिले.
संबंधित मोलकरणीने दोन दिवस त्यांच्याकडे काम केले. त्यानंतर 29 जूनला मोलकरणीने जेष्ठ महिलेला पिण्यासाठी पाणी दिले. त्यामध्ये तिने गुंगीचे औषध मिसळल्याने महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर मोलकरणीने घरातून 4 हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा 8 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मोलकरणीने दागिने लांबविले
पुणे-घरमालकीण अंघोळीला गेल्याची संधी साधून घरकाम करणाऱ्या मोलकरणीने त्यांचे 1 लाख 15 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना ढोले पाटील रस्त्यावरील बाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिली आहे.




























































