
देशासह राज्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार सुरू आहे. नगर पाठोपाठ आता रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार श्रीरामपूरमध्ये सुरू झाला आहे. औषधाचा काळाबाजार करणाऱ्या शुभम श्रीराम जाधव ( रा. कोल्हार, ता. राहाता), प्रवीण प्रदीप खुने, (रा. भातंबरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर) या दोघांना श्रीरामपूर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून मोटारसायकल व मोबाईल असा 1 लाख 10 हजारांचा ऐवज तसेच बॅगेतून 26 हजार 800 रुपयांची रकम जप्त केली. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी सकाळी रेल्वे कॉलनीतील एका युवतीच्या वडिलांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तिला जास्त किमतीने दोघे जण औषध देणार असल्याची माहिती संजय रुपटके यांना मिळाली. त्यांनी त्यांचे मित्र गणेश जायगुडे, सोमनाथ कदम यांना घेऊन इंजेक्शन घेण्यासाठी पैसे नेऊन दिले व तेथेच थांबून सोमनाथ कदम याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नरवडे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस नरवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी आले त्यांनी पाळत ठेवून या दोघांना साखर कामगार हॉस्पिटलच्या बाहेर मोटारसायकलवरून येताना पाहिले. त्यावेळी त्यांनी त्या तरुणीला 4 हजार 800 रुपये किंमतीचे इंजेक्शन औषध 20हजार रुपयास विकत असताना पकडले.
कोणीतरी पाळत ठेवून असल्याचे समजताच एकजण पसार झाला . मात्र त्यालाही काही वेळातच पकडण्यात आले. शुभम श्रीराम जाधव,( रा. कोल्हार ता. राहाता), प्रवीण प्रदीप खुने, (रा. भातंबरी, ता. बार्शी, जिल्हा सोलापुर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. ते येथील डॉ. अक्षय शिरसाठ यांचेकडे वॉर्ड बॉय म्हणून काम करत असून त्यांनीच रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी दिले, असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी दोन पंचांना बोलावून घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात असलेले 4 हजार 800 रुपये किमतीचे बॉक्समध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर असलेली काचेची बाटली, 50 हजार रुपये किमतीची एमएच 23 एएम 0933 या क्रमांकाची काळ्या रंगाची बजाज पल्सर कंपनीची मोटार सायकल, 60 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 26 हजार 800 रुपये रोख रक्कम मिळून आल्याचे सांगितले.तसा पंचनामा केला आहे.
याप्रकरणी संजय बाळासाहेब रुपटक्के यांनी पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी शुभम श्रीराम जाधव, प्रवीण प्रदीप खुने या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील करत आहे.



























































