
नाकाबंदीदरम्यान वाहनचालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून पोलिसांना जखमी केल्याच्या घटना ग्रँट रोड आणि दादर परिसरात घडल्या. याप्रकरणी डी. बी. मार्ग आणि दादर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. पहिली घटना शुक्रवारी रात्री घडली. तक्रारदार हे दादर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री ते नेहमीप्रमाणे ड्युटीला आले. शनिवारी पहाटे नियंत्रण कक्षाच्या आदेशाने ते दादरच्या एका शो रूमसमोर नाकाबंदीला होते. शनिवारी पहाटे एका वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करत होते तेव्हा चारचाकी वाहन सुसाट वेगात जात होते. त्याचवेळी गस्तीला असलेल्या पोलिसांनी त्या वाहनचालकाला थांबण्यास सांगितले.
चालकाने वाहन न थांबवता लोखंडी बॅरिकेट्सला धडक देऊन तो पुढे जाऊ लागला. त्या चालकाने तक्रारदार, पोलीस हवालदार आणि एका खासगी व्यक्तीला धडक दिली. त्या धडकेत त्या तिघांना दुखापत झाली. या घटनेनंतर ड्युटीला असणाऱ्या उपनिरीक्षकाने त्या चालकाला थांबण्यास सांगितले, मात्र तो थांबला नाही. पोलिसांनी पाठलाग करून त्या चालकाला वांद्रे-वरळी सागरी सेतू येथे पकडले. तो चालक खार येथे राहत असून त्याच्या विरोधात दादर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
दुसरी घटना ग्रँट रोड परिसरात घडली. तक्रारदार हे डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री ते ग्रँट रोड पूर्व येथे ड्युटीला होते. रात्री एक जण ट्रिपल सीट मोटरसायकल चालवत आला. त्या मोटरसायकलला नंबर प्लेटदेखील नव्हती. तेव्हा तक्रारदार यांनी मोटरसायकलस्वाराला थांबण्यास सांगितले. त्याने तक्रारदार यांना मारहाण करून त्यांच्या अंगावर मोटरसायकल नेली. मोटरसायकल नेल्याने ते जखमी झाले. त्या घटनेनंतर ते तिघे पळून गेले. डी. बी. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.



























































