दोन संशयितांनी विचारला अंबानींच्या घराचा पत्ता, ‘अ‍ॅण्टिलिया’ची सुरक्षा वाढवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील अ‍ॅण्टिलियाबाबत दोन संशयित व्यक्ती चौकशी करत असल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या या प्रकारानंतर अ‍ॅण्टिलियाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पोलीस त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. तपासासाठी पोलिसांच्या आणि क्राइम बँचची पथके तयार करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत त्या टॅक्सीचालकाचा पोलीस जबाब नोंदवून घेत होते. सोमवारी दुपारी एक वाजता टॅक्सीचालक हा किल्ला कोर्टाबाहेर उभा होता. तेव्हा एक वॅगनआर गाडी आली. गाडीत बसलेल्या दोघांनी हिंदी भाषेत संवाद साधत अंबानी यांच्या घराची माहिती विचारली. त्या दोघांचा संवाद हा संशयास्पद वाटल्याने टॅक्सीचालकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या टॅक्सीचालकाची चौकशी केली असता त्याने आपण त्या दोघांचे चेहरे नीट पाहिले नसल्याचे पोलिसांना सांगितले. ती गाडी कशी नेमकी आली याचा शोध सीसीटीव्ही फुटेजद्वारे घेतला जात आहे. रात्री उशिरा स्केच काढणारे आर्टिस्टदेखील पोलीस ठाण्यात आल्याचे समजते. तीन वेळा चौकशीनंतर टॅक्सीचालकाला सोडून देण्यात आले.