
समना प्रतिनिधी । मुंबई
ताडदेवमध्ये शनिवारी सकाळी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आरटीओ कार्यालयाच्या जवळ असलेल्या श्री सिद्धी टॉवर येथे ही दुर्घटना घडली. इमारतीचे बांधकाम सुरू असताना झालेल्या या अपघातात दगावलेले दोघे कामगार असल्याचे समजते.
आरटीओ कार्यालयाजवळ राठोड बिल्डरचे काम सुरू असून खोदकामातून काढलेल्या मातीचा ढिगारा बाजूच्या भिंतीवर पडल्यामुळे हा अपघात झाला. स्थानिक नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली. यात तीन जण जखमी झाले होते. त्यांना पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल केले असता फैज खान (24) आणि तपनदास (28) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर जयदेव रॉय या 22 वर्षांच्या युवकाला उपचार करून सोडून देण्यात आले.



























































