
सामना ऑनलाईन, मुंबई
लोकसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 16 जून रोजी पुन्हा प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत दाखल होणार आहेत. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदारही श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे हजारो शिवसैनिकांच्या रूपाने भगवे वादळ घेऊन रामजन्मभूमीत दाखल झाले होते. त्यावेळी अवघा देश भगवामय झाला होता. लोकसभा निवडणुकीनंतर आपण शिवसेनेच्या सर्व खासदारांसह अयोध्येत श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी येऊ, असे उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी सांगितले होते. तसेच प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण व्हावे यासाठी ‘जय श्रीराम’चा नारा देण्यात आला होता. त्याला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द खरा करत ते आपल्या विजयी शिलेदारांसह अयोध्येला जाणार आहेत.

























































