आर्थिक श्वेतपत्रिका काढणार; प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरविणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत लवकरच श्वेतपत्रिका काढून वास्तव जनतेसमोर ठेवले जाणार आहे. सध्या प्रगतीपथावर असलेले प्रकल्प, त्यांची सध्या असलेली आवश्यकता, त्यासाठी लागणारा खर्च व निधीची उपलब्धता याचा विचार करून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.

विश्वासदर्शक ठराव व अध्यक्ष निवडीसाठी बोलवण्यात आलेले विधिमंडळाच्या दोन दिवसांचे अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात राज्याची आर्थिक स्थिती दर्शवणारा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जनतेसमोर ठेवण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. याबाबत विचारले असता राज्याच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात कोणती विकासकामे सुरू आहेत ती कोठे सुरू आहेत. त्यावर किती खर्च होत आहे, किती कामे पूर्णत्वाला आली आहेत, कोणती कामे रखडली आहेत व त्यामागील कारणे काय याचा लेखाजोखा आर्थिक श्वेतपत्रिकेत जनतेसमोर मांडण्यात येईल. त्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार कामांचा प्राधान्यक्रम ठरकला जाईल. जी कामं तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे त्या कामाना आवश्यक निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सरकार सर्व प्रकल्पांचा आढावा घेणार असले तरी केवळ आकसाने निर्णय घेतले जाणार नाहीत. बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द केलेला नाही. आधी आढावा घेऊन मगच निर्णय घेतले जातील. मेट्रो-3 या प्रकल्पालाही स्थगिती दिलेली नाही केवळ कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आरे कारशेड आंदोलकांवरील गुन्हे मागे
आरे कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आरे कारशेडमुळे झाडांच्या होणाऱ्या कत्तलीचा विरोध करण्यासाठी आंदोलन पुकारणाऱ्या पर्यावरणप्रेमी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. या निर्णयामुळे पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मेट्रो कारशेडसाठी आरे येथे जागा दिल्याने सुमारे 2500 हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेनेने या वृक्षतोडीचा जोरदार विरोध केला होता. त्याचप्रमाणे पर्यावरण प्रेमी आंदोलकांनीही निषेध करीत ठिय्या आंदोलन पुकारले होते. या सर्वांवर पोलिसी कारवाई करीत तत्कालीन सरकारने गुन्हे दाखल केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यापाठोपाठ आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे आंदोलकांना दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधानांना भेटणार!
अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटामुळे अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला मदत करावी या मागणीसाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्यांनाही सोबत नेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला लाखो कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र त्या तुलनेत महाराष्ट्राला कमी निधी मिळतो. त्यामुळे संकटाच्या या स्थितीत तरी केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तेव्हा पूर्वीप्रमाणे भावाभावाचे नाते कायम राहावे अशी अपेक्षा आपण व्यक्त केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

परस्परांच्या संमतीने खातेवाटप
नव्याने आमचं सरकार कामाची सुरुवात करीत आहोत. आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून खातेवाटप निश्चित करू. अत्यंत समजुतीने तिन्ही पक्षात खाती वाटली जातील. मी धरून सध्या सात मंत्री आहेत. परस्परांच्या संमतीने हे खातेवाटप केलं जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.