
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. महानगरपालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच निर्णय होणार आहे. तसेच राज्यातही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट चर्चेचा विषय बनली आहे.
उद्धव ठाकरे आज दुपारी ‘शिवतीर्थ’वर पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे अन्य कुणीही नेते किंवा पदाधिकारी नव्हते. सुमारे दीड तास उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर होते. महानगरपालिका निवडणुका एकत्रितपणे लढताना महाविकास आघाडीत मनसेचाही समावेश व्हावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेना आणि मनसेची महापालिकेसाठी युती व्हावी अशा कार्यकर्त्यांच्याही भावना आहेत. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची या भेटीत चर्चा झाली. युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, जागावाटपाची रणनीती ठरल्यानंतर ती केली जाईल असे सांगण्यात येते. त्यादृष्टीनेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आजची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या भेटीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा पह्टो मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मध्यभागी अविनाश जाधव दिसत आहेत. जाधव यांनी फोटो पोस्ट करताना त्यावर ‘‘सुरुवात…’’ असे नमूद केले आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे यांच्यात निवडणुकांसाठी चांगली सुरुवात झाली असावी अशी चर्चा सुरू झाली आहे.




























































