
भाजप आणि गद्दार किती ढोंगी आहेत हे आता सगळय़ांच्या लक्षात येतेय. कपटकारस्थानी भाजपने आधी पक्ष फोडले, आता घरे फोडू लागले आहेत. त्यांच्या हिंदुत्वाचे बिंगही फुटले आहे. त्यामुळेच भाजप आता समाजात भाषावाद आणि प्रांतवादाचे विष पसरवत असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला चांगलेच फटकारले.
‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळय़ाप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा फाडला. ते म्हणाले की, आपण मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये जे हत्याकांड झाले त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. मात्र त्या हत्याकांडाला जबाबदार धरून भाजपने ज्याच्यावर आरोप केले त्यालाच त्यांनी आता पक्षात घेतले. यानंतर बोभाटा झाल्यामुळे लगेच त्या प्रवेशाला स्थगितीही दिली. त्यांना वाटले होते की आपले पाप लपून जाईल, मात्र भाजपचे पाप चव्हाटय़ावर आल्यामुळेच त्यांनी प्रवेशाला घाईघाईने स्थगिती दिल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
हे लढणाऱ्या शिवसैनिकांचे सैन्य
शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून दररोज प्रवेश होत आहेत. ‘मातोश्री’चा परिसर गजबजून जातोय. पण ही नुसती गर्दी नाहीय, तर लढणाऱया शिवसैनिकांची संघटना, सैन्य आहे. पण येणारी लढाई सोपी नाही. तुम्ही एका जोशात आहात. जोश पाहिजेच, पण त्याच बरोबरीने डोळे उघडून सगळीकडे बघा. कारण भाजप आणि गद्दार कारस्थानी आहेत.
मागाठाणेमध्ये एक गद्दार बोलला की, मराठी ही आपली माय आहे, तर हिंदी आपली मावशी आहे. मात्र माय मेली तरी चालेल. कारण हिंदी आपली मावशी आहे. तिने मला जास्त प्रेम दिले आहे. असा संदेश पसरवणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची.
कोणत्याही भाषिकावर अत्याचार नको!
कल्याणहून मुंबईला येणाऱया एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला ‘मराठी बोलायची लाज वाटते का’, असे विचारत टोळक्याने जबर मारहाण केली. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना दुर्दैवी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणत्याही भाषिकावर अन्याय-अत्याचार नको. भाषावादावरून मारा, खून करा अशी आपली भूमिका नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
































































