शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज, 6 ऑगस्टपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे असतील, अशी माहिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली. या दौऱयामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दौऱयात उद्धव ठाकरे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतील. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी व अन्य पक्षांचे नेतेही उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
– दौऱयाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येणार आहेत. उद्धव ठाकरे आज दिल्लीतील मराठी मीडियाशी संवाद साधणार असून 7 ऑगस्टला राष्ट्रीय मीडियाशी संवाद साधतील, असे संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख पहिल्यांदाच दिल्लीत येत आहेत. देशाच्या राजधानीत हा त्यांचा संवाद दौरा आहे, असे संजय राऊत म्हणाले.