
सामना प्रतिनिधी, मुंबई
अवघ्या राज्याला दुष्काळाच्या झळा लागल्या असून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जानेवारी रोजी बीड दौऱ्यावर जाणार आहेत.
राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज शिवसेना नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक ‘मातोश्री’ निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून तेथील शेतकऱयांशी संवाद साधतील. तसेच या वेळी शिवसेनेतर्फे मोठी मदत मोहीमही राबविण्यात येणार असून बीडमध्ये तब्बल 100 ट्रक पशूखाद्य वाटपाचा शुभारंभ होणार आहे. त्यापैकी बीडमध्ये 30 टन, जालन्यात 10 टन पशूखाद्य वाटप होईल.
त्यानंतर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा 12 जानेवारीपासून दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. यावेळी 500 पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात येईल. तसेच 15 किलो तांदूळ, 15 किलो गहू, साखर, चणाडाळ, कांदे, बटाटे प्रत्येकी 5 किलो, गोडे तेल 5 लिटर, चहा पावडर 1 किलो या अन्नधान्याचे पॅकेट तब्बल पाच हजार शेतकऱयांना वाटण्यात येणार आहेत.
कर्जमाफीची चौकशी झालीच पाहिजे!
काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढरपुरात जाहीर सभा झाली होती. त्या सभेत त्यांनी किती शेतकऱयांना कर्जमाफी मिळाली याची माहिती घ्या, सर्व्हे करा, असे आदेश शिवसैनिकांना दिले होते. जानेवारीमध्ये दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार असेही त्यांनी जाहीर केले होते. उद्धव ठाकरे आता दुष्काळग्रस्त शेतकऱयांशी संवाद साधतील आणि कितीजणांना मदत मिळाली, कर्जमाफीच्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली याची चौकशी करतील, असेही कदम यांनी पत्रकारांना सांगितले.






























































